फलटण चौफेर | दि. १७ डिसेंबर २०२५
फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस (झेड प्लस सुरक्षा) यांचा फलटण शहर दौरा होत असून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी सातारा जिल्ह्यातून हजारो नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.सभास्थळ हे क्रांतीवीर नाना पाटील चौकाजवळ असून येथून पंढरपूर, पुणे, दहिवडी व बारामतीकडे जाणारे प्रमुख वाहतूक मार्ग असल्याने, सभेदरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत राहावी तसेच नागरिक व वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी वाहतूक मार्गात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
याबाबत सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी भापोसे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३४ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १८/१२/२०२५ रोजी सकाळी ७.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत खालीलप्रमाणे अधिसूचना जारी केली आहे.
वाहतूक मार्गातील बदल
• पंढरपूरकडून लोणंद–पुण्याकडे जाणारी वाहतूक श्रीराम कारखाना बायपास रोड – सोमवार पेठ वजन काटा – बारामती पूल – जिंती नाका मार्गे वळविण्यात येईल.
• पुणे–लोणंदकडून पंढरपूरकडे जाणारी वाहतूक जिंती नाका – बारामती पूल – सोमवार पेठ वजन काटा – श्रीराम कारखाना बायपास रोड – पालखी मार्गे जाईल.
• पंढरपूरकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक श्रीराम कारखाना बायपास रोड – सोमवार पेठ वजन काटा मार्गे जाईल.
• बारामतीकडून पंढरपूरकडे जाणारी वाहतूक सोमवार पेठ वजन काटा – श्रीराम कारखाना बायपास रोड – पालखी मार्गे जाईल.
• दहिवडी ते पुणे/बारामती व पुणे/बारामती ते दहिवडी ही वाहतूक पूर्ववत सुरू राहील.
नो पार्किंग व बंद रस्ते
• बारामती पूल ते दहिवडी चौक दरम्यान नो पार्किंग झोन राहील.
• छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या चारही बाजूंना ५०० मीटर परिसर नो पार्किंग झोन राहील.
• बारामती चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक – क्रांतीवीर नाना पाटील चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहील.
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा मार्ग देखील वाहतुकीसाठी बंद राहील.
• फलटण विमानतळ – गिरवी नाका – रेस्ट हाऊस – सफाई कामगार कॉलनी कॉर्नर – महात्मा फुले चौक – डेक्कन चौक – स्तंभ चौक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक हा व्हीआयपी मार्ग नो पार्किंग झोन घोषित करण्यात आला आहे.
वाहतूक वळविण्यात आलेल्या सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांनी व वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी यांनी केले आहे.

