फलटण चौफेर दि २० ऑक्टोबर २०२५
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून वाठार निंबाळकर जिल्हा परिषद गटातून सुरवडी पंचायत समिती गणात महायुतीकडून धनंजय प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.
तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांचे ज्येष्ठ सुपुत्र असलेले धनंजय साळुंखे पाटील हे फलटण पंचायत समितीचे माजी सदस्य, सुरवडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तसेच साखरवाडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामामुळे त्यांची ओळख लोकाभिमुख नेतृत्व म्हणून झाली आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद गटांच्या फेररचनेनुसार सुरवडी, ,वडजल,नांदल,मिरगाव, ढवळेवाडी, काशीदवादी, घाडगेमळा, घाडगेवाडी,मुळीकवाडी, ही गावे हिंगणगाव गटातून वाठार निंबाळकर गटात जोडली गेली आहेत. तर निंभोरे हे गाव साखरवाडी गटातून वाठार निंबाळकर गटामध्ये जोडले गेले आहे त्यामुळे या गटातून पंचायत समिती उमेदवार म्हणून धनंजय साळुंखे पाटील यांचे नाव प्रबळपणे चर्चेत आहे.
महायुतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून धनंजय साळुंखे पाटील यांच्या उमेदवारीसाठी जोरदार पाठपुरावा सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या संघटनात्मक अनुभवामुळे आणि सामाजिक कार्यामुळे हा गण महायुतीच्या दृष्टीने मजबूत होऊ शकतो, असा कार्यकर्त्यांचा विश्वास आहे.आगामी काही दिवसांत महायुतीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर होणार असून वाठार निंबाळकर गटात साळुंखे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता राजकीय स्तरावर व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या गणातील निवडणूक लढत चुरशीची होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.


