Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जागतिक तापमानवाढीवर मात करण्यासाठी वृक्षारोपण हाच एकमेव पर्याय – श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर मुरूम विकास सोसायटीच्या शताब्दी महोत्सवात आवाहन

 



फलटण चौफेर दि २० ऑक्टोबर २०२५

“आज महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारी अतिवृष्टी असो किंवा अनियमित पावसाचे चक्र असो — हे सर्व जागतिक तापमानवाढीचे परिणाम आहेत. निसर्गचक्र पूर्णपणे कोलमडून गेले आहे. यावर उपाय म्हणून वृक्षारोपणाशिवाय दुसरा पर्याय नाही. झाडे लावणे हे अवघड काम नाही, परंतु त्यातून आपल्या पुढच्या पिढ्यांचे भविष्य वाचू शकते,” असे प्रतिपादन विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.ते मुरूम विकास सोसायटीच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.


या वेळी फलटण-कोरेगावचे माजी आमदार दीपक चव्हाण,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, हिंगणगाव जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य धैर्यशील अनपट, पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, श्रीराम कारखान्याचे व्हाईस चेअरमन नितीन शाहूराजे भोसले, संचालक रमेश बोंद्रे,शरदराव रणवरे,बाजार कमिटीचे व्हा चेअरमन भगवानराव होळकर, महादेव बोंद्रे, फलटण तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष धनंजय पवार, होळ विकास सोसायटीचे चेअरमन राजेंद्र भोसले, माजी चेअरमन सुधीर भोसले, मुरूम विकास सोसायटीचे चेअरमन दशरथ शिंदे, व्हा चेअरमन दिनकर गायकवाड, मातोश्री कन्स्ट्रक्शनचे संजय भोसले व मुरूम  सोसायटीचे सर्व संचालक सचिव त्याचबरोबर परिसरातील राजे गटाचे कार्यकर्ते व मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.



रामराजे पुढे म्हणाले, “शंभर वर्षांपूर्वी सहकार अस्तित्वात यायच्या आधी मुरूम विकास सोसायटीची स्थापना झाली होती. शेतकऱ्यांना सावकारकीच्या जोखडातून मुक्त करण्याचे कार्य या संस्थेने केले आहे. संस्थेने पारदर्शक कारभार ठेवत स्वतःच्या जागेवर इमारत उभी केली आहे. यंदा दिवाळीनिमित्त सभासदांना ९ टक्के लाभांश वाटप करणे हे कौतुकास्पद आहे.”ते पुढे म्हणाले, “जागतिक तापमानवाढीबरोबरच बागायती पट्ट्यात क्षारयुक्त जमिनींचे प्रमाण वाढत आहे. जिथे एकेकाळी ६० ते ७० टन उसाचे उत्पादन मिळायचे, तिथे आता ३० ते ४० टनांवर आले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांची लागवड करणे आवश्यक आहे. तीस वर्षांच्या कष्टातून उभ्या केलेल्या या तालुक्याचे रक्षण करण्यासाठी येणाऱ्या निवडणुका आपण एकदिलाने जिंकल्या पाहिजेत.”



या वेळी मनोगत व्यक्त करताना संजीव राजे नाईक निंबाळकर म्हणाले, “फलटण तालुक्यातील काही संस्था शंभर वर्षांच्या इतिहासाच्या आहेत. त्यात मुरूम विकास सोसायटी अग्रस्थानी आहे. संस्थेचे संस्थापक चेअरमन कै. सोपान अमृता बोंद्रे यांनी १९२५ साली स्थापन केलेल्या या सोसायटीचा कारभार आजही उत्कृष्ट पद्धतीने चालतो आहे. जिल्हा बँक व सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सातत्याने आर्थिक बळ दिले जात आहे.”ते पुढे म्हणाले, “फलटण संस्थान काळातच सहकाराची पाळेमुळे या भागात रोवली गेली होती. लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या स्थापनेपासूनच विविध सोसायट्यांचा कारभार फलटणच्या सहकारी चळवळीचा पाया घालणारा ठरला.”कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव बोंद्रे यांनी केले. माजी आमदार दीपक चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सोसायटीच्या पारदर्शक कारभाराचे कौतुक करून संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र टिळेकर यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.