Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

“तुम्ही घरात बसलात म्हणून पराभव झाला!” — कोळकीतील कार्यकर्ता आढावा बैठकीत श्रीमंत रामराजेंची कार्यकर्त्यांना जाहीर फटकार

 


फलटण चौफेर दि १९ ऑक्टोबर २०२५

फलटण तालुक्यातील कोळकी येथील अनंत मंगल कार्यालयात  राजे गटाचा कार्यकर्ता आढावा बैठक आज उत्साहात पार पडली. या बैठकीस तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर होते. तसेच माजी आमदार दिपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक नंबर फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीत राजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती



या वेळी बोलताना रामराजे म्हणाले, “तुम्ही घरात बसलात म्हणून आपला पराभव झाला तुम्ही पाय रोवून उभे राहिला असतात तर  विरोधकांना तुमच्या गावात पाय ठेवायची सुद्धा हिम्मत झाली नसती कार्यक्रमाला जमलेली गर्दी बघून आपल्याकडे एवढे कार्यकर्ते होते तर मग पराभव का झाला असा सवाल उपस्थित केला


रामराजेंनी थेट आरोप केला की, “विरोधकांनी निवडणुकीत पैसे वाटले, मतं विकत घेतली. पण जर तुम्ही गावोगावी पाय रोवले असते, कार्यकर्ते म्हणून खंबीर उभे राहिलात असता, तर कोणाचीही हिंमत झाली नसती अशा प्रकारे पैसे वाटण्याची.“आगामी निवडणुका आपल्या अस्तित्वाच्या आहेत. आज तुम्हाला कार्यकर्ता म्हणून त्रास होतोय, पण उद्या नागरिक म्हणून होणार आहे. म्हणून आता जागे व्हा. पोलीस चौकीला न घाबरणारा, संकटाला न झुकणारा कार्यकर्ता मला हवा आहे. आम्ही तिघेही  बंधू तुमच्यासाठी वाटेल ते करू, वेळ आली तर तुरुंगात जाऊ, पण तुम्ही मागे हटू नका.”



गटाच्या बांधिलकीबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितले, “आपला मूळ पक्ष हा अपक्षच आहे. आपल्या तालुक्यात पक्ष गौण आहे, गटच महत्त्वाचा आहे. मात्र, कोणत्या पक्षात जायचं हे मी ठरवेन. मला राजकारणाचं गणित कळतं. मी तीस वर्षं मुंबईच्या चौपाटीवर लाटा मोजत बसलो नव्हतो. जे गेले ते संपले — गट सोडून गेलेल्यांचा हाच शेवट आहे.”रामराजे पुढे म्हणाले, “नीरा-देवघर धरणाचं श्रेय घेणारे आज मोठे दावे करतात; पण जर धरण झालं नसतं, तर पाईपलाईन टाकली असती का? आणि साखरवाडी व श्रीराम साखर कारखाने चालू नसते, तर तालुक्यातील शेतकऱ्यांचं काय झालं असतं, याचा विचार करा. आज तालुक्यात वीस लाख टन ऊस आहे, हे कोणाच्या नेतृत्वामुळे शक्य झालं हे लक्षात घ्या.”बैठकीच्या शेवटी त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केलं — “वाद न घालता, एकजुटीने, नव्या जोमाने पुन्हा कामाला लागा. हे आपल्या अस्तित्वाचं युद्ध आहे. राजे गटाची ओळख म्हणजे निष्ठा, संघटन आणि लढाऊ वृत्ती — ती पुन्हा दाखवण्याची वेळ आली आहे.”या बैठकीला तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, महिला, तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.