फलटण चौफेर दि २६ ऑक्टोबर २०२५
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरवर अत्याचाराचा आरोप असलेला पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने अखेर स्वतःहून पोलिसांकडे शरण आला आहे. शनिवारी (२५ ऑक्टोबर) रात्री तो रिक्षाने येऊन फलटण शहर पोलिस ठाण्यात हजर झाला. घटनेनंतर पोलिस ठाण्यासमोर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.गुरुवारी रात्री फलटणमधील एका हॉटेलमध्ये महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या हातावर लिहिलेल्या मजकुरात “पीएसआय गोपाळ बदने यांनी माझ्यावर चार वेळा अत्याचार केला, तर प्रशांत बनकर यांनी मानसिक छळ केला” असे स्पष्ट लिहिले होते. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती.
घटनेनंतर बदने हा फरार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी सातारा पोलिसांनी बीड, पुणे आणि पंढरपूर येथे पथके रवाना केली होती. दोन दिवसांच्या शोधानंतर अखेर शनिवारी रात्री उशिरा तो स्वतःहून पोलिस ठाण्यात शरण आला.बदने पोलिस ठाण्यात हजर झाल्याची माहिती मिळताच नागरिकांनी पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवला.दरम्यान, गेल्या दोन दिवसांत तो नेमका कुठे होता, त्याला कोणी मदत केली का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. बदनेच्या चौकशीतून या प्रकरणातील अनेक महत्त्वाच्या बाबी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

