फलटण चौफेर दि १९ ऑक्टोबर २०२५
श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण संचलित सौ. वेणुताई चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, तरडगाव यांच्या प्राचार्या सौ. संगीता गोरखनाथ काकडे मॅडम यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी मंगळवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी जिंती (ता. फलटण) येथील एका ५५ वर्षीय महिलेच्या तब्बल २० वर्षांपासून असलेल्या जटा सोडविल्या.वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी असलेल्या या कुटुंबात जटा ठेवणे मान्य नव्हते, तरीही अंधश्रद्धेमुळे आणि जटा सोडवता येतात हे माहीत नसल्याने त्या महिलेला दीर्घकाळ जटा ठेवाव्या लागल्या. दरम्यान, शेजारी राहणाऱ्या प्राचार्या सौ. संगीता काकडे यांनी त्या महिलेचे समुपदेशन करून तिचा विश्वास संपादन केला.यानंतर त्यांनी रयत विज्ञान परिषदेचे समन्वयक व जटा निर्मूलन चळवळीचे कार्यकर्ते डॉ. सुधीर कुंभार यांच्याशी संपर्क साधून त्या महिलेच्या शंका दूर केल्या व जटा सोडवण्याचा कार्यक्रम ठरवला.
या उपक्रमात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रशांत पोतदार व त्यांचे सहकारी ॲड. हौसेराव धुमाळ (सातारा), राजेश पुराणिक, मंदाकिनी गायकवाड, शारदा निंबाळकर, आयाज अत्तार आणि संगीता काकडे यांनी सहभाग घेतला.
या प्रसंगी परिसरातील अनेक महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. जटा सोडवल्यानंतर त्या महिलेच्या आणि तिच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर मुक्तीचा आणि समाधानाचा आनंद झळकत होता.या सामाजिक कार्याबद्दल श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या अध्यक्षा सौ. सविता काकी सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), नियामक मंडळ सदस्य महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) तसेच सर्व सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व समित्यांनी प्राचार्या संगीता काकडे मॅडम यांच्या या समाजजागृतीच्या कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले.

