फलटण चौफेर, दि. १५ ऑगस्ट २०२५
मौजे उपळवे (ता. फलटण) या मूळ महसुली गावाच्या अंतर्गत असलेल्या जाधवनगर, सावंतवाडी आणि दऱ्याचीवाडी या वाड्यांना सन 2002 मध्ये स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा, तसेच 2004 मध्ये स्वतंत्र ग्रामपंचायती मिळाल्या होत्या. मात्र वाडी विभाजनाची प्रक्रिया अपूर्ण असल्याने आजवर महसुली नोंदवहीत उपळवे हे एकच गाव म्हणून अस्तित्वात होते.
महसूल आणि भूमी अभिलेख विभागामार्फत ही प्रक्रिया पूर्ण होत, आजपासून मौजे उपळवे, मौजे जाधवनगर, मौजे सावंतवाडी आणि मौजे दऱ्याचीवाडी ही चारही गावे प्रत्यक्षात स्वतंत्र महसुली गावे म्हणून अस्तित्वात आली आहेत. यामुळे या चारही गावांचे स्वतंत्र 7/12 उतारे आता ऑनलाईन उपलब्ध झाले असून, गेल्या महिनाभर जमिनीच्या हस्तांतरणावर असलेले तात्पुरते निर्बंधही हटविण्यात आले आहेत.नागरिकांनी वाडी विभाजनानंतर आपला नवीन गट नंबर जाणून घेण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी, उपळवे यांच्याशी संपर्क साधावा, असे तहसीलदार डॉ अभिजित जाधव यांनी कळविले आहे.या महत्त्वाच्या कामात फलटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील, तसेच चारही गावांचे लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.