फलटण चौफेर दि १९ ऑगस्ट २०२५
वाठार निंबाळकर, ता. फलटण येथील एका विवाहितेने जाचहाटाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार दि १७ रोजी रात्री घडली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पती, सासू व सासरे या तिघांना अटक करण्यात आली आहे. दिपाली अजिंक्य निंबाळकर (रा. वाठार निंबाळकर, ता. फलटण) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर पती अजिंक्य हनुमंत निंबाळकर, सासू सुरेखा हनुमंत निंबाळकर, सासरा हनुमंत रावसाहेब निंबाळकर (सर्व रा. वाठार निंबाळकर ता. फलटण) यांना अटक केली आहे. प्रज्ञा प्रवीण एरंडे (रा. मालदेववाडी भुईंज, ता. वाई) व सीमा संतोष इंगळे (रा. महाड, ता. महाड) यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद भाग्यश्री मारुती पाचागणे (रा. बावधन, ता. वाई) यांनी दिली आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिपाली निंबाळकर यांचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना एक मुलगी आहे. त्या गरोदर होत्या. माहेरहून पैसे आण म्हणून पती अजिंक्य त्यांना वारंवार मारहाण करत होता. तर सासू-सासरे दोन नणंदा पैशासाठी शारीरिक व मानसिक छळ करत होत्या. गरोदर असतानाही तिला काम करावयाला लावत. या त्रासाला कंटाळून तीने गळफास घेऊन आत्महत्या केली.