फलटण चौफेर दि २४ ऑगस्ट २०२५
कुरेशीनगर येथे गाईंच्या कत्तलीप्रकरणी फलटण शहर पोलिसांनी कारवाई करत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात बिलाल रफिक कुरेशी याला अटक करण्यात आली असून सायरा रफिक कुरेशी व वसीम रफिक कुरेशी यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास कुरेशीनगर परिसरात आरोपींनी स्कॉर्पिओ (क्र. MH-13 AC-2324) व सुपर कॅरी सीएनजी छोटा हत्ती (क्र. MH-11 DD-5530) या वाहनांतून गोवंशीय सदृश्य जनावरे आणून त्यांच्या राहत्या घराच्या पहिल्या मजल्यावर गाईंची कत्तल केली. या कारवाईतून तब्बल 20 हजार रुपयांचे मांस व कातडी, 3.50 लाखांची स्कॉर्पिओ, 4 लाखांचा सुपर कॅरी वाहन व सुमारे 7 हजारांची मोठी पातेली असा एकूण 7 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील आरोपी बिलाल कुरेशी हा सातारा जिल्ह्यासह शेजारच्या तालुक्यांतून हद्दपार असूनसुद्धा त्याने फलटण शहरात प्रवेश करून कत्तलीत मदत केली. दरम्यान, वसीम कुरेशी हा पोलिसांची चाहूल लागताच पसार झाला.या प्रकरणी पोलीस हवालदार संदीप लोंढे यांच्या फिर्यादीवरून फलटण शहर पोलीस ठाण्यात , प्राण्यांचा छळ अधिनियम, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, मोटार वाहन अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईत सपोनि नितीन शिंदे, सहा.पोनि सुरेश शिंदे, पोलीस हवालदार पूनम वाघ, माधवी बोडके, पूनम बोबडे, रुपाली भिसे, नितीन सजगणे, पोलीस शिपाई जितेंद्र टिके, काकासो कर्णे, अतुल बडे, सूरज परिहार, स्वप्नील खराडे यांनी सहभाग घेतला.तपास मपोहवा पूनम वाघ करीत आहेत.