फलटण चौफेर दि १५ ऑगस्ट २०२५
लोणंद नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा दिनांक १३ रोजी नगरपंचायत कार्यालयात पार पडली. नगराध्यक्षा मधुमती गालिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. उपनगराध्यक्ष गणीभाई कच्छी उपस्थित होते, तर मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी सभेसमोर सर्व प्रस्ताव मांडले.
सभेत घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये —स्मारक उभारणी: लोणंद शहरातील सिटी सर्व्हे नं. २६४ मधील सरकारी जागेवर छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांची स्मारके उभारण्याचा ठराव. या जागेची मोजणी करून स्मारक उभारणीसाठी एजन्सी नेमण्याचे नियोजन.
राष्ट्रीय महामार्ग विस्तार: लोणंद-सातारा रस्ता (NH965DD व NH965D) शहरातून जाताना कोणतेही खाजगी दुकाने किंवा मालमत्ता अधिग्रहित न करता काम करण्याचे निर्देश.
कर नोंदीत सवलत: नगरपंचायतीच्या मिळकत कर नोंदीवर कर्ज/गहाण खत नोंदवण्यासाठी 0.15% ते 0.30% इतका दर निश्चित.
डॉल्बी व डी.जे. बंदी: व्यापारी महासंघ, मेडिकल असोसिएशन व नागरिकांच्या मागणीवरून लोणंद शहरात डी.जे. व डॉल्बी वाजविण्यास बंदी. पोलीस प्रशासनाने कडक अंमलबजावणी करावी, यासाठी पत्रव्यवहार करण्याचा ठराव.
या निर्णयांना सभागृहाने एकमताने मंजुरी दिली.
सभेत नगराध्यक्षा मधुमती गालिंदे, उपनगराध्यक्ष गणीभाई कच्छी, मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड, बांधकाम सभापती सुप्रिया शेळके, पाणीपुरवठा सभापती सचिन शेळके, तसेच नगरसेवक रविंद्र क्षीरसागर, शिवाजीराव शेळके पाटील, भरत शेळके, भरत बोडरे, माजी नगराध्यक्षा सीमा खरात, रशिदा इनामदार, दिपाली शेळके, राजश्री पाटील, तृप्ती घाडगे, दिपाली संदीप शेळके, ज्योती डोनीकर, प्रविण व्हावळ, आनंदराव शेळके पाटील, स्वीकृत नगरसेवक सागर शेळके आणि सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
नगराध्यक्षा मधुमती गालिंदे यांनी सांगितले की, “या निर्णयांमुळे लोणंद शहराचा सार्वजनिक वाहतूक, स्वच्छता, पर्यावरण आणि नागरी सुविधांच्या क्षेत्रात लक्षणीय विकास होणार आहे.” मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनीही या कामांची अंमलबजावणी वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने होईल, असे आश्वासन दिले.