फलटण चौफेर दि १४ ऑगस्ट २०२५
सातारा जिल्ह्यातील खंडाळा गावाच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील मोनिका लॉज येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखा, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथक आणि खंडाळा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सात जणांना अटक केली. या कारवाईत सहा पिडीत महिलांची सुटका करण्यात आली.शुक्रवार, १३ ऑगस्ट रोजी अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार छापा टाकण्यात आला. आरोपींनी वेश्याव्यवसायासाठी महिलांना लॉजमध्ये ठेवून ग्राहकांना पुरविण्याचे काम चालवले होते, असे पोलिसांनी सांगितले.
अटक संशयतांमध्ये राहुल वसंता श्रृंगारे, रावेश शेट्टी, मोहम्मद जावेद अख्तर, दत्ता राजू देवकर, हरीष वासूदेव शेट्टी, शुभम आप्पासो घुले आणि रंजनकुमार लक्ष्मण मल्लीक यांचा समावेश आहे. सर्व आरोपींवर भा. दं. सं. १४३(२), १४४(२) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ४ व ५ अंतर्गत खंडाळा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक एस. एस. शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हस्के, महिला पोलीस उपनिरीक्षक क्षेता पाटील यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व खंडाळा पोलिस ठाण्याच्या पथकाने केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाईत सहभागी सर्वांचे कौतुक केले आहे.