फलटण चौफेर दि १० जुलै २०२५
वारुगड ट्रेकर ग्रुप, फलटण यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पन्हाळा–पावनखिंड ही ऐतिहासिक पदभ्रमंती मोहीम शनिवार दि. १२ जुलै व रविवार दि. १३ जुलै २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेची माहिती आयोजक बाबासाहेब तावरे यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज, वीर बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशिद आणि बांदल-जाधव सेनेच्या शौर्याच्या साक्षीदार असलेला घोडखिंडचा इतिहास आजही प्रत्येक शिवभक्ताच्या मनात स्फुरण निर्माण करतो. याच ऐतिहासिक मार्गावरून पन्हाळगड ते पावनखिंड अशी सुमारे ५५ किलोमीटरची पदभ्रमंती यानिमित्ते होणार आहे.या खडतर मोहिमेसाठी ग्रुपचे सदस्य शुक्रवार दि. ११ जुलै रोजी शिवाजी चौक, फलटण येथून प्रस्थान करतील. मोहिमेला शुभेच्छा देण्यासाठी शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. पहिल्या दिवशी म्हाळुंगे, मसाई पठार, कुंभारवाडी, खोतवाडी, मांडलाईवाडी, करपेवाडी, आंबेवाडी, कळकेवाडी, चाफेवाडी, रिंगेवाडी या मार्गाने प्रवास करत माळवाडी येथे पहिला मुक्काम होणार आहे. दुसऱ्या दिवशी पाटेवाडी, सुकमाचा, धनगरवाडा, म्हसवडे, पांढरेपाणी मार्गे पावनखिंड येथे पोहोचून मोहिमेचा समारोप केला जाईल.
१३ जुलै १६६० या रात्रीचा इतिहास आणि बाजीप्रभू देशपांड्यांचे पराक्रम यांची आठवण या प्रवासात शिवप्रेमींना होणार आहे. मसाई पठाराची जैवविविधता, ओढे, नाले, धबधबे, निसरड्या पायवाटा, पाण्यातील पायवाटांचा अनुभव आणि निसर्गाच्या सान्निध्यात ही मोहीम अधिक स्मरणीय ठरणार आहे.
या मोहिमेत इंजिनिअर, पोलीस, शिक्षक, उद्योजक, व्यापारी, तरुण, व्यावसायिक, शेतकरी, कामगार अशा विविध क्षेत्रातील ८० शिवप्रेमी सदस्य सहभागी झाले आहेत. अनेक अनुभवी ट्रेकर्स यामध्ये सहभागी असून, ही सलग तिसरी मोहीम आहे.या यशस्वी आयोजनासाठी सतीश नलवडे सर आणि त्यांचे सहकारी विशेष परिश्रम घेत आहेत.