साखरवाडी पुढारी वृत्तसेवा,
साखरवाडी ते बडे खान रस्त्यावर "पाच सर्कल" या ठिकाणी असलेले वडाचे झाड सध्या अतिशय धोकादायक स्थितीत असून, कोणत्याही क्षणी झाड किंवा त्याच्या फांद्या रस्त्यावर कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थ व नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे झाड तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे.सदर वडाचे झाड जुने व जीर्ण अवस्थेत असून त्याच्या मोठ्या फांद्या सध्या रस्त्याच्या मध्यभागी झुकलेल्या स्थितीत आहेत.
साखरवाडी परिसरातील हे महत्त्वाचे रस्ते जिथे दोन्ही बाजूंनी शालेय विद्यार्थी, नागरिक, व्यापारी व ऊस वाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणावर ये-जा करत असतात. विशेषतः साखरवाडी परिसरातील दोन प्रमुख शिक्षण संस्था, तसेच साखर कारखान्यातील ऊस वाहतूक याच रस्त्यावरून होत असल्याने वाहतूक नेहमीच गजबजलेली असते.
या पार्श्वभूमीवर वडाच्या झाडाचा अचानक पडणाऱ्या फांद्या किंवा झाड संपूर्णपणे कोसळल्यास मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे संबंधित वन विभाग, ग्रामपंचायत किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या धोकादायक झाड काढून टाकावे अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.
प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ उपाययोजना करावी, अन्यथा संभाव्य अपघातास जबाबदार कोण? गोविंद थोरात ग्रामस्थ पाच सर्कल