फलटण चौफेर दि ८ जुलै २०२५
साखरवाडी, ता. फलटण येथे इस्कॉनच्या वतीने भगवान श्रीजगन्नाथ, बलराम आणि सुभद्रामाता यांच्या प्रतिकात्मक रथयात्रेचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण गावात भक्तीमय वातावरणात ही यात्रा पार पडली. सकाळी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पिंपळवाडी येथून रथयात्रेस प्रारंभ होऊन बस स्टँड, सात सर्कल रोड मार्गे ती साखरवाडी गावात फिरली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्रीजगन्नाथांचा अभिषेक, पूजन व रथ पूजनाने झाली. या वेळी श्रीमान सुंदरवर दास (अध्यक्ष, इस्कॉन सासवड/फलटण) यांनी रथयात्रेस परवानगी दिल्याबद्दल आयोजकांनी त्यांचे आभार मानले. साक्षी अच्युत दास यांचेही मार्गदर्शन लाभले.
रथ ओढताना पारंपरिक वेशभूषा, नृत्य-कीर्तन, रांगोळ्या व पुष्पसजावट यामुळे संपूर्ण साखरवाडी हरी नामाच्या जयघोषांनी निनादून गेली. हजारो भक्तांनी हर्षोल्हासात सहभाग घेतला. महिलावर्ग ‘माताजी’ंच्या पारंपरिक वेशभूषेने व भक्तीगीतांनी वातावरण भारावले. विविध गावांतील कृष्णभक्त – खामगाव, कोऱ्हाळे, मुरूम, कुसुर व फलटण – यांचा देखील उत्स्फूर्त सहभाग लाभला.
“रथे तु वामनं दृष्ट्वा पुनर्जन्म न विद्यते” – या भावनेने रथावर आरूढ झालेल्या भगवान जगन्नाथांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. यात्रेचे संपूर्ण नियोजन इस्कॉन साखरवाडी मॅनेजमेंट कमिटीने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडले.
यात्रेनंतर नागरिकांनी समाधान व्यक्त करत दरवर्षी अशीच भक्तिभावाने भरलेली यात्रा साखरवाडीत व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. आयोजक व स्वयंसेवकांचे यशस्वी आयोजनाबद्दल अभिनंदन करण्यात आले.