फलटण चौफेर | दि. ८ जुलै २०२५
शिवथर (ता. सातारा) येथे विवाहित महिलेला राहत्या घरी धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून निर्घृणपणे खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे केवळ आठ तासांतच सातारा तालुका पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करत प्रियकर आरोपीला पुण्यातून अटक केली.
दि. ७ जुलै रोजी पूजा प्रथमेश जाधव (वय २७, रा. शिवथर) या विवाहित महिलेचा खून तिच्या राहत्या घरात गळा दाबून व धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून करण्यात आला होता. गुन्हा घडल्यानंतर सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर व उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तातडीने आदेश दिले. पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलिसांनी तपास सुरू केला.
गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासात उघडकीस आले की, मयत पूजाचे तिच्याच गावातील एका तरुणाशी गेली सहा वर्षे अनैतिक प्रेमसंबंध होते. प्रियकराने तिला पळून जाऊन लग्न करण्यासाठी तगादा लावला होता. मात्र पूजाने यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या प्रियकराने तिच्या घरात जाऊन गळा दाबून व धारदार शस्त्राने तिच्यावर वार करत खून केला व घटनास्थळावरून फरार झाला.तपासपथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी पुणे येथील स्वारगेट परिसरात असल्याचे शोधून काढले. तत्काळ कारवाई करत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि विनोद नेवसे व त्यांच्या पथकाने आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले. अवघ्या आठ तासांत खून उघडकीस आणून आरोपीस अटक करण्यात आली.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर व उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोनि निलेश तांबे यांच्या सूचनेनुसार पार पडली. सपोनि विनोद नेवसे, सपोनि अनिल मोरडे, पो.उ.नि. अभिजीत गुरव, पो.उ.नि. सोनु शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचार्यांच्या पथकाने कौशल्याने तपास करून ही यशस्वी कारवाई केली.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि विनोद नेवसे हे करीत आहेत. सातारा पोलीस दलाच्या तात्काळ आणि परिणामकारक कारवाईमुळे या गुन्ह्याचा जलद छडा लागला आहे.