फलटण चौफेर दि ५ जुलै २०२५
नुकत्याच ओढवलेल्या अतिवृष्टीमुळे फलटण शहरात निर्माण झालेली पूरपरिस्थिती, तसेच संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे नियोजन आणि सोहळ्यानंतर तात्काळ करण्यात आलेली स्वच्छता या सर्व बाबतीत फलटण नगर परिषद प्रशासनाने दाखवलेली तत्परता व कार्यक्षमता वाखाणण्याजोगी आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास महायुतीचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी व अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याधिकारी मोरे यांनी पुरस्थितीत केलेल्या जलद उपाययोजना, नागरिकांना दिलासा देणारे निर्णय, तसेच पालखी मार्गाचे यशस्वी नियोजन यामुळे शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू न देता सोहळा शांततेत पार पडला.
पालखी मार्गस्थ झाल्यानंतर लगेचच पालखी मुक्कामस्थळी संपूर्ण परिसरात स्वच्छता करून उत्कृष्ट उदाहरण नगर परिषदेकडून प्रस्तुत करण्यात आले.याप्रसंगी बोलताना माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, "शहर प्रशासनाने पुरस्थितीचा सामना करत नागरिकांच्या सुरक्षेसाठी जे काम केले, ते अभिनंदनीय आहे. तसेच पालखी सोहळ्याचे सुयोग्य नियोजन व स्वच्छतेसाठी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे."यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, महायुतीचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी श्री. निखिल मोरे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.