फलटण चौफेर (शिवाजी भोसले)
खराडेवाडी (ता. फलटण) गावातील प्रसिद्ध आणि ग्रामस्थांची श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून मंदिरातील काही मौल्यवान वस्तू शोधण्याचा प्रयत्न केला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडले व आत प्रवेश केला. त्यांनी देवाच्या पूजेच्या साहित्यामध्ये शोधाशोध करत काही वस्तू चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र मंदिरात कोणतीही मौल्यवान वस्तू न मिळाल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
ही घटना भर वस्तीतील मंदिरात घडल्याने ग्रामस्थांमधून भिती व संताप व्यक्त केला जात आहे. अशा पवित्र स्थळी चोरीचा प्रयत्न होणे ही गंभीर बाब मानली जात असून गावात सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची मागणी होत आहे.चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीसुध्दा ग्रामस्थांनी केली आहे.