Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वीज जोडणीचा भरणा करूनही वीज जोडणी करीता महावितरण कर्मचारी त्रास देत असल्याने वीज ग्राहक हैराण



फलटण चौफेर दि २ जुलै २०२५

  फलटण महावितरणच्या विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व उपविभागात नवीन वीज मीटर जोडणीचे पैसे भरूनही जोडणी करीता लाईनमन व जनमित्र त्रास देत असल्याने वीज ग्राहक हैराण झाले आहेत.



फलटण विभागीय कार्यालयांच्या अंतर्गत येणाऱ्या फलटण शहर, फलटण ग्रामीण, लोणंद, खंडाळा या उपविभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भागातील वीज ग्राहक पुरते वैतागले असून महावितरण कर्मचारी यांच्याकडून विज मिटर जोडणी करण्याकरीता अडवणूक होत असल्याचा आरोप वीज ग्राहक करत आहेत.



नवीन वीज जोडणीसाठी पैसे भरलेल्या ग्राहकांना विविध कारणांमुळे विज जोडणीपासून वंचित रहावे लागत आहे. नागरिकांना वीज सेवांच्या अधिकारांची माहिती नसणे याचाच फायदा महावितरण कर्मचारी उचलत आहेत. एकीकडे नागरिकांना महावितरण कार्यालयाच्या चकरा न मारता फक्त २४ तासात ग्राहकांना वीज जोडणी देण्याचा उपक्रम महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने सुरू केला पण त्यांची अंमलबजावणी महावितरणच्या फलटण विभागीय कार्यालयाकडून होताना दिसत नाही. एक महिना उलटूनही वीज जोडणी मिळत नसल्याने अनेक वीज ग्राहक हैराण झाले आहेत.



अनेक महिन्यापासून विज मीटरची जोडणीची वाट  पाहणाऱ्या अनेक नागरिकांना आर.सी.सी.बी बसवा त्याशिवाय वीज पुरवठा मिळणार नाही, वीज जोडणी अर्जावर लाईनमन व जनमित्र यांची सही नाही असे उत्तर दिले जात आहे परंतु दुसरीकडे निवडक मर्जीतील ठेकेदार तसेच इच्छापूर्ती करणाऱ्या ग्राहकांना तत्काळ विज मीटर जोडणी मिळत आहे. 



 महावितरण बारामती परिमंडळचे मुख्य अभियंता , सातारा मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता , महावितरण विभागीय कार्यालय फलटण कार्यकारी अभियंता या अधिकारी वर्गाची भूमिका काय आहे? हे कळत नाही. वेळेत वीज न देणाऱ्या लाईनमन व जनमित्र यांनी विज मिटर जोडणी प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होत आहे. महावितरणने मागील अनेक महिन्यातील एकूण प्रलंबित वीज जोडणी यादी व त्यांपैकी दिली गेलेली वीज जोडणी यांची यादी संपूर्ण तपशीलवार जाहीर करावी. नियमबाह्य विज जोडणीबाबत जबाबदार महावितरण कर्मचारी अनेक ग्राहकांनी थेट ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली असून सोबत वरिष्ठ अधिकारी हे तक्रारीबाबत दुर्लक्ष करत असल्याचे पुरावे जोडून पाठवत असल्याने आता ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस काय कारवाई करणार ? ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणात कडक भूमिका घेणार की काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.