फलटण चौफेर, दि २ जुलै २०२५
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यानंतर सुरवडी येथे ग्रामपंचायतच्या वतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. ग्रामविकास अधिकारी शशिकांत माने यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी संपूर्ण गावात प्लास्टिक संकलन व परिसर स्वच्छतेचे काम केले
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गावात आलेल्या हजारो वारकऱ्यांमुळे विविध ठिकाणी कचऱ्याचे प्रमाण वाढले होते. या पार्श्वभूमीवर शशिकांत माने यांच्या नेतृत्वाखाली सफाई कामगार आणि ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी सार्वजनिक ठिकाणांची व रस्त्यांची साफसफाई केली.
सकाळपासूनच विविध ठिकाणी पसरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, थरमोकॉल, पिशव्या, खाऊच्या उरकलेल्य वस्तू यांचे संकलन करून काळ्या पिशव्यांमध्ये भरून योग्य विल्हेवाट लावण्यात आली. फलटण-पंढरपूर रस्त्यालगत ही स्वच्छता मोहीम विशेषत्वाने राबविण्यात आली.गावकऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून, "स्वच्छतेबाबतची ग्रामपंचायतीची तत्परता वाखाणण्याजोगी आहे," असे स्थानिकांनी सांगितले.