फलटण चौफेर, दि. २जुलै२०२५ : भिलकटी, ता.फलटण येथे बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असलेली बांगलादेशी महिला पोलिसांना आढळून आली असून काटून एम. एस. टी. एंजेला असे पासपोर्टवर त्या महिलेचे नाव असून तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना जिल्हा विशेष शाखेकडून फलटण तालुक्यात एक विदेशी महिला तिच्या व्हिसाची मुदत ८ जुलै २४ संपल्यानंतरही वास्तव करत आहे.याबाबत फलटण पोलिस भिलकटी येथे चौकशीसाठी गेले असता. त्यांना भिलकटी येथे काटून एम. एस. टी. एंजेला नावाची बांगलादेशी महिला हाजीर राजा साहब शेख (रा. निकमवस्ती भिलकटी) या व्यक्तीसोबत रहात असल्याचे आढळून आले. त्या महिलेकडे
कागदपत्रांची तपासणी करून अधिक माहिती घेतली असता तिच्याकडे सलमा काटून असे तेलंगणा राज्याचे आधार कार्ड आढळून आले.तिच्याकडे सलमा हाजीर शेख या नावाचे महाराष्ट्र राज्याचेही आधार कार्ड आढळून आले. त्याचबरोबर कुरेश मज्जिद फलटण, कुरेशनगर ता. फलटण यांच्याकडील निकाह प्रमाणपत्र त्यावर दूल्हे का नाम हाजीर राजा साहब शेख (रा. निकमवस्ती) तसेच दुल्हन का नाम सलमा हाजी मोहम्मद सरदार (रा. सोलापूर) असे आढळून आले.
या महिलेने दि. ९ जुलै २०१९ रोजी पासपोर्ट काढला व त्याची मुदत दि. ८ जून २०२४ रोजी संपली. त्या महिलेकडे बांगलादेशचे मतदान कार्डाची झेरॉक्स प्रतही सापडली आहे. तिच्याकडे सापडलेल्या पासपोर्ट, महाराष्ट्र राज्य आधारकार्ड व तेलंगणा आधारकार्ड यावर असलेल्या जन्म तारखेमध्ये विसंगती आढळून आली. त्या महिलेकडे मतदान कार्डही आढळून आले आहे. याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.