फलटण चौफेर │ १६ जुलै २०२५ │
निरा देवधर धरणातील पाणी लाभक्षेत्राबाहेर वळवण्याचा कोणताही विचार नाही, अशी ठाम भूमिका जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत मांडली.आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करताना सांगितले की, निरा देवधरचे पाणी लाभक्षेत्र सोडून इतर ठिकाणी वळवले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे स्थानिक शेतकरी वर्गात चिंता आहे.
या प्रश्नाला उत्तर देताना जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांनी स्पष्ट सांगितले की, लाभक्षेत्रात शेतकऱ्यांनी शेतीसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. यामुळे त्यांचे नुकसान होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल. त्यांनी खात्री दिली की, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी दुसरीकडे वळवले जाणार नाही.या विषयावर चर्चा करताना त्यांनी असेही नमूद केले की, सध्याच्या स्थितीत कुठेही नियमबाह्य पाणी वळवले गेले असल्याचे निदर्शनास आलेले नाही. तरीदेखील शेतकऱ्यांमध्ये जर शंका असेल, तर संबंधित खात्याकडून चौकशी करून योग्य निर्णय घेतला जाईल.