फलटण चौफेर १६ जुलै २०२५ :
सातारा जिल्ह्यातील वाढे फाटा परिसरात देशी बनावटीचे पिस्टल विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या पथकाने अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे पिस्टल, एक जिवंत काडतूस, एक बजाज पल्सर मोटारसायकल, तसेच ३ मोबाईल हॅण्डसेट असा एकूण ₹१,८०,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
दिनांक १५ जुलै २०२५ रोजी, वाढे फाटा परिसरात सापळा रचून पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेले संशयित आरोपी हे पोलीस अभिलेखावरील असून त्यामध्ये:
ओम बापुराव महानवर, रा. साखरवाडी, ता. फलटणश्रीय उर्फ मॉन्टी शरद खताळ, रा. कापडगाव, ता. फलटण व त्यांचा एक साथीदार यांचा समावेश आहे.त्यांच्याविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, ७, २५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या कारवाईत पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक रोहित फाणे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, आणि इतर अनेक पोलीस अंमलदारांचा मोलाचा सहभाग होता.पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी या यशस्वी कारवाईसाठी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.