फलटण चौफेर दि १३ जुलै २०२५
सातारा शहरातील बेंगळूर–पुणे राष्ट्रीय महामार्गावर नवीन वाहनाची 'ड्रोन'च्या सहाय्याने चित्रिकरण करताना वाहतूक रोखल्याच्या प्रकरणी पाच युवकांवर सातारा शहर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात आली आहे. हे चित्रिकरण सोशल मीडियावर 'इन्स्टाग्राम रील्स' स्वरूपात व्हायरल करण्यात आले होते. याबाबत सातारा शहर पोलीस स्थानकातून मिळालेली अधिक माहिती अशी,दि. १० जुलै २०२५ रोजी एका युवकाने नवीन चारचाकी वाहन खरेदी केल्यानंतर आपल्या मित्रांच्या मदतीने कोल्हापूर-पुणे लेनवर गाड्या थांबवून ड्रोनद्वारे शूटिंग केले. या प्रकारामुळे महामार्गावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता. हे दृश्य इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने तातडीने याची दखल घेतली. सातारा शहर डी.बी. पथक, वाहतूक शाखा व भुईंज येथील महामार्ग पोलीस यांच्या संयुक्त प्रयत्नांतून या पाच युवकांचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओम प्रविण जाधव (वय २१, रा. तारळे, ता. पाटण, सध्या रा. जुना आर.टी.ओ. चौक, सातारा),कुशल सुभाष कदम (रा. सदरबझार, जरंडेश्वर नाका, सातारा),सोहम महेश शिंदे (वय २०, रा. शिंगणापूर, ता. माण),निखील दामोदर महांगडे (वय २७, रा. परखंदी, ता. वाई)व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांचा समावेश आहेपोलीसांनी संबंधित वाहन चालक व ड्रोन ऑपरेटरचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले असून, उर्वरित साथीदारांविरोधात पुढील कारवाई सुरू आहे.
सातारा पोलिसांचे आवाहन
नवीन वाहन खरेदी, लग्न समारंभ वा वाढदिवस अशा कार्यक्रमांत काही युवक महामार्गावर किंवा सार्वजनिक ठिकाणी वाहने अडवून चित्रिकरण करत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे इतर नागरिकांना गैरसोय होते. त्यामुळे अशा प्रकारांवर सातारा जिल्हा पोलीस दलाकडून कारवाई करण्यात येणार असून, नागरिकांनी अशा कृतीपासून दूर राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय अधिकारी राजीव नवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के आणि वाहतूक निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.सहायक पोलीस निरीक्षक शामराव काळे, अभिजीत यादव, पो.उ.नि. सुधीर मोरे, व पोलिसांच्या चमूने ही कार्यवाही केली.