तरडगाव : नवनाथ गोवेकर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सोमवार दि. २७ जून रोजी फलटण तालुक्यातील तरडगाव मुक्कामी येत असून पालखी सोहळ्यासाठी लाखो वैष्णवभक्त दाखल होणार आहेत त्या अनुशंगाने प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या असून उर्वरित कामे देखील अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांनी भेटीदरम्यान दिली.
पालखी सोहळ्यासाठी पालखी तळावर दर्शनासाठी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र २०० फूट बॅरीगेट लावण्यात आले आहे. विजेच्या दिव्यांसह आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी मैदानावर मुरूम टाकून रोलिंग करून घेण्यात आले आहे. पालखी तळावरील झाडेझुडपे काढून सपाटीकरण करून परिसर पूर्ण स्वच्छ करण्यात आला आहे. दरवर्षी सोहळयातील दिंड्या वास्तव्य करीत असलेल्या विविध ठिकाणी वाढलेल्या काटेरी झुडपांची विल्हेवाट लावली जात आहे. अरुंद रस्त्याच्या बाजूचा कचरा उचलून जागा मोकळी केली जात आहे. पालखी तळालगतच महिला व पुरुषांसाठी अंघोळीकरिता स्वतंत्र स्नानगृहची सोय करण्यात आली आहे. परिसरात १८०० निर्मलवारी शौचालये विविध ठिकाणी उभी करण्यात आली आहेत. तरडगाव परिसरामध्ये वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सुविधांची सोय करण्यात आली आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पथक करून विविध ठिकाणी दवाखाने उभारण्यात येणार आहेत. पालखी मार्गावरील सर्व विहिरीच्या पाण्याची तपासणी करून निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
पालखी मार्गातील सर्व रस्त्यांची साफसफाई करून घेण्यात आलेली आहे. पालखीला अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटून टाकण्यात आल्या आहेत. पालखी महामार्गावरील अर्धवट कामे पूर्ण करून रस्त्याच्या साइडपट्या साफ करून घेण्यात आल्या आहेत. पालखी मुक्कामी ठिकाण तसेच संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येणार आहे. सोहळा काळात पाणीपुरवठ्याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. विविध सतरा ठिकाणी पाण्याचे टँकर भरण्याची सोय करण्यात आली आहे. लोणंद - फलटण मार्गावर वाहतुकीला अडथळा येणार नाही. यासाठी पर्यायी मार्गाने वाहने वळवण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत.
पालखी सोहळ्यासाठी वीज, आरोग्य, पाणी, रस्ते व वाहतुकीच्या सर्व सोयीचे ग्रामपंचायतीच्यावतीने पूर्ण तयारी झाली असून सोहळा सुरळीतपणे पार पडण्याची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडू असे ग्रामसेवक दिपक सोनवणे यांनी सांगितले. यावेळी माजी उपसरपंच प्रशांत गायकवाड, ग्रा.प.सदस्य संतोष कुंभार,अतुल गायकवाड, दीपक गायकवाड, व्हाईस चेअरमन महावीर शहा, माजी सदस्य चंद्रकांत चिरमे, वैष्णव गायकवाड, आदित्य गायकवाड, संजय खुडे आदी उपस्थित होते.पालखी तळावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून पालखी सोहळ्याच्या स्वागताची प्रशासनाबरोबर तरडगावकरांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. सोहळ्यातील पहिल्या रिंगण सोहळ्याची तयारी पूर्ण. तरडगाव येथे दि. २७ जून रोजी सायं.५ वाजता पालखी सोहळा मुक्कामी येत असून सोहळा दाखल होण्याआधी दुपारी चार वाजता पुरातन चांदोबाचा लिंब याठिकाणी सोहळ्यातील अश्वांचे पहिले उभे रिंगण पार पडणार आहे. डोळ्याचे पारणे फेडणारा हा सोहळा पाहण्यासाठी लाखो वैष्णवांची गर्दी याठिकाणी होत असते . यादृष्टीने प्रशासनाने या ठिकाणी जय्यत तयारी केली आहे. पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. रिंगण कालावधीत सोहळ्यातील वाहनांना वाहतुकीस अडथळा येऊ नये यासाठी महामार्गाचे रुंदीकरण करून स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.