Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण पालिकेची युद्धपातळीवर तयारी

 


फलटण चौफेर दि २५ जून २०२५

आळंदीहून प्रस्थान केलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे दिनांक २८ जून रोजी फलटण मुक्कामी आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर पालखीच्या स्वागतासाठी फलटण नगरपरिषदेच्या वतीने विविध कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मुख्याधिकारी निखील मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे यासंदर्भात सविस्तर माहिती दिली शहरातील रस्त्यांची डागडुजी व डांबरीकरणाची कामे सार्वजनिक बांधकाम विभाग व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या सहकार्याने सुरू असून, पावसाच्या अडथळ्यातून सुद्धा महत्त्वाच्या मार्गांची डागडुजी पूर्ण झाली आहे. पालखी मार्गावरील सांडलेली माती, दगड काढण्याचे काम आणि संपूर्ण मार्गाची स्वच्छता स्वतंत्र पथकांद्वारे केली जात आहे.



शहरातील पुलांचे तुटलेले रेलिंग तातडीने दुरुस्त करण्यात आले असून, नदीपुलावरून वारकऱ्यांना सुरक्षित वाटचाल होईल याची खास खबरदारी घेतली आहे.वारकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून प्रत्येक प्रमुख चौकात पाणपोई उभारण्यात येणार असून, पाणी टँकर भरण्यासाठी पालिकेच्या केंद्रावर एकाचवेळी ८ टँकर भरण्याची सोय करण्यात आली आहे. एक टँकर केवळ ७-८ मिनिटांत भरून निघू शकतो.वाहतूक नियोजनासाठी वारकऱ्यांच्या मालवाहतूक व अन्य वाहनांसाठी विशेष मार्ग निश्चित करण्यात येत आहेत.



पालखी तळावर पावसाचा परिणाम होऊ नये म्हणून रस्ते डांबरीकरण झाले असून साईड पट्ट्या मुरुमाने भरल्या आहेत. २ जेसीबी, २ ट्रॅक्टर व ५० कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्वच्छतेचे काम अंतिम टप्प्यात आहे.दर्शनासाठी पालखी तळावर बारीची व्यवस्था पूर्ण झाली असून लाईटसाठी ८ सॅटेलाईट पॉईंट व जनरेटर लावण्यात आले आहेत. तात्पुरती शौचालये, स्नानगृहे व विद्युत व्यवस्था देखील करण्यात आली आहे. यावर्षी पावसाचा जोर लक्षात घेता लाल मातीऐवजी कमी जाडीची कच टाकण्यात येत आहे आणि काही ठिकाणी बॅरिकेटिंगही करण्यात येत आहे.


यावर्षी प्रथमच जर्मन मंडपाच्या माध्यमातून YC कॉलेजमध्ये वारकरी सेवा केंद्र उभे करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने सुरू होणाऱ्या या केंद्रात १५० डॉक्टर सेवा देणार असून, स्नानगृह उभारणीचे काम सुरू आहे.पालखी तळावर कोणतीही हातगाडी, हॉटेल लावण्यास परवानगी नसून, गर्दी नियंत्रणासाठी फिरते पथक व पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे.आरोग्य विभागाच्या वतीने छोटे हॉस्पिटल व दवाखाना उभारण्यात येत असून, हिरकणी कक्ष व २० फिजिओथेरपी डॉक्टरांची सुविधा देखील वारकऱ्यांसाठी उपलब्ध असणार आहे.फलटण पालिकेच्या वतीने हे सर्व प्रयत्न सुनिश्चित करत आहेत की संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा फलटण येथे सुखरूप आणि शिस्तबद्ध पार पडावा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.