फलटण चौफेर दि २३ मे २०२५
वर्ल्ड रेकॉर्ड बुक,राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या 'कर्मयोगी आबासाहेब' सिनेमाला 'महासागर एक्सलन्स अवॉर्ड 2025' चा 'उत्कृष्ट दिग्दर्शक' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
दैनिक महासागर आणि पनवेल प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके सभागृहात 'महासागर एक्सलन्स अवॉर्ड 2025' चे आयोजन करण्यात आले होते,यावर्षीचा पुरस्कार अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या 'कर्मयोगी आबासाहेब' ला देण्यात आला आहे.
लेखक,दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांनी दिग्दर्शित केलेल्या 'कर्मयोगी आबासाहेब' सिनेमाला याआधी मानाचा समजला जाणाऱ्या 'सांस्कृतीक कलादर्पन' पुरस्काराने 'लक्षवेधी सिनेमा' म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.तसेच दादासाहेब फाळके,थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हलसह अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'कर्मयोगी आबासाहेब' ची निवड करण्यात आली असून कान्स फिल्म फेस्टीवलसाठी सुद्धा सिनेमा रवाना झाला आहे.
अल्ताफ दादासाहेब शेख यांना याआधीच वर्ल्ड रेकॉर्ड बुक,गिनिज बुक सह अनेक राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.'महासागर एक्सलन्स अवॉर्ड 2025' ने अल्ताफ शेख यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.या पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून आलेल्या नामांकनां पैकी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.या सिनेमाने भुलभुलैया,सिंघम रिटर्न यांसारख्या बिग बजेट सिनेमांना आव्हान देत बॉक्स ऑफिसवर दमदार कलेक्शन केले असून यशस्वी ठरलेल्या 'कर्मयोगी आबासाहेब' सिनेमावर पडणारा पुरस्कारांचा वर्षाव काही थांबत नाही.अथक परिश्रम,योग्यतेची जाणीव,अंगभूत कलागुण आणि चित्र-संगीताची जन्मजात पारख या बळावर विविध चित्रपटांचे लेखन,दिग्दर्शन केले आहे.
"कर्मयोगी आबासाहेब" या चित्रपटाने अनेक विश्व रेकॉर्ड ही केले आहेत.चित्रपट प्रदर्शनापूर्वीच अँम्सटरडॅम लिफ्ट-ऑफ आणि क्राऊनवूड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाने 'गिनीज बुक आणि हाई रेंज ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड,लंडन बुक ऑफ रेकॉर्ड' असे वेगवेगळे ३२ आंतरराष्ट्रीय पुरस्कार ही प्राप्त केले आहे. दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या एकविसाव्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टीवलमध्ये चंदेरी दुनियेतील अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत अल्ताफ दादासाहेब शेख दिग्दर्शित "कर्मयोगी आबासाहेब" या चित्रपटाचे स्क्रिनिंग पार पडले आहे.
युरोप 15'- आम्सटरडॅम लिफ्ट-ऑफ ऍवॉर्ड,बेंगलोर- इंटरनॅशनल पॅनोरामा फिल्म फेस्टिव्हल ऍवॉर्ड,थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल ऍवॉर्ड,यु.के. सिडनी- लिफ्ट ऑफ फिल्म फेस्टिव्हल ऍवॉर्ड,लाहोर- इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऍवॉर्ड,स्विडन- फायनलिस्ट फिल्म फेस्टिव्हल ऍवॉर्ड,क्राऊन वुड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऍवॉर्ड,भारत नॅशनल ऍवॉर्ड,स्पेशल ज्युरी ऍवॉर्ड- Tamizhagam इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऍवॉर्ड,गोल्डन लायन फिल्म फेस्टिव्हल ऍवॉर्ड इत्यादी पुरस्कार मिळाले आहेत.ही घोडदौड अशीच सुरु असतानाच 'सेलिब्रेटी कौन' हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.तसेच काही चित्रपटांचे चित्रीकरण सुरु असून आणखी काही चित्रपटांची लवकरच घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांनी दिली आहे. प्रेक्षकांनी 'कर्मयोगी आबासाहेब' चित्रपटाला जसा भरभरुन प्रतिसाद दिला तसाच आगामी चित्रपटांना सुद्धा चांगला प्रतिसाद देतील अशी अपेक्षा व्यक्त केली असून प्रेक्षक देखिल सेलिब्रिटी कौन या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.
आर्थिक परिस्थितीला आव्हान देत जिद्द,चिकाटी,मेहनत,नवनवीन संकल्पना आणि उद्देशावर लक्ष केंद्रीत करुन सोलापूर जिल्ह्यातील नंदेश्वर नावाच्या छोट्याशा खेड्यातून आलेल्या अल्ताफभाईंनी सिने क्षेत्राची कसलीही पार्श्वभूमी नसताना केलेले धाडस आणि आपल्या तालावर नाचायला लावलेले यश हे खरोखरच डोळे दिपविणारे आहे.अल्ताफ दादासाहेब शेख यांना पुरस्कार मिळाल्या बद्दल एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर विशाल धेंडे आणि प्रॉडक्शन मॅनेजर गणेश गोरे यांनी अल्ताफभाईंचे अभिनंदन केले असून संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या सन्मान सोहळ्यासाठी चित्रपट अभिनेत्री दिपाली सय्यद,माजी खासदार तथा लोकनेते रामशेठ ठाकूर,दैनिक महासागर चे मुख्य संपादक श्रीकृष्ण चांडक,पनवेल प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे,बेटी बचाव चे प्रमुख डॉ.गणेश राख,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.पनवेल प्रेस क्लब आणि दै. महासागर च्या टीमने जबाबदारीने कामगिरी बजावत हा पुरस्कार सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न केला.