विडणी (योगेश निकाळजे) विडणी ग्रामपंचायतीमध्ये बदलून आलेले ग्रामविकास अधिकारी यांच्या सहीचे नमुने शासकीय तसेच बँक खात्यास देण्यास विरोध केल्याने राजेगटाच्या उपसरपंचासह ९ सदस्यांना पुणे विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरवले आहे. याबाबतचे आदेश प्रशासनाला प्राप्त झाले असून हा राजेगटाला धक्का मानला जात आहे.उपसरपंच सुनिल अब्दागिरे, सदस्य सचिन कोकरे, हनुमंत भोसले, बापूराव पवार, सुशांत जगताप, सौ. गौरी जाधव, सौ. शीला वाघमारे, सौ. राणी अभंग, सौ. शुभांगी काळुखे हे सर्वजण अपात्र घोषीत झाले आहेत.
विडणी येथील ग्रामपंचायतीची सन २०२२ मध्ये निवडणूक पडली. यामध्ये लोकनियुक्त सरपंच म्हणून सागर अभंग हे निवडून आले. तसेच एकूण १७ सदस्यांपैकी १३ सदस्य हे राजेगटाचे निवडून आल्याने त्यांचे बहुमत होते.विडणी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी बळीप यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर ग्रामविकास अधिकारी या पदाचा कार्यभार एकळ यांच्याकडे सोपवण्यात आला. ग्रामपंचायतीचा आर्थिक कारभार सुलभ होण्यासाठी एकळ यांच्या स्वाक्षरीचे नमुने विविध शासकीय तसेच बँक खात्यांमध्ये पाठवणे आवश्यक असल्याने दि. १८ ऑक्टोबर २०२३ रोजी ग्रामपंचायतीची मासिक सभा झाली. या सभेत १७ सदस्यांपैकी ५ सदस्य गैरहजर होते. या विषयास राजेगटाच्या सदस्यांनी विरोध केला. या विषयी ग्रामसेवक यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती फलटण यांच्याकडे मार्गदर्शन मागवले होते. यावर त्यांनी सदस्यांना विरोध करू नये या आशयाची नोटीस दिली होती. मात्र तरीदेखील ९ सदस्यांनी सहीचे नमुने बदलण्यासाठी विरोधच दर्शवला. त्यामुळे सरपंच सागर अभंग यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाप्रमाणे पुणे विभागीय आयुक्त यांच्या न्यायालयात दाद मागितली होती. याचा निकाल लागला असून यामध्ये विडणी गावचे उपसरपंचासह ९ सदस्यांना अपात्र केल्याचा आदेश आयुक्तांनी दिला आहे.
दरम्यान अजून तरी आमच्या हातात विभागीय आयुक्तांच्या संपूर्ण निकालाची प्रत आलेली नाही. तरी सध्या सर्वत्र राजकीय परस्थिती पाहता प्रशासकीय अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आणून प्राप्त केलेला निकाल आहे. सदर निकाला विरोधात हायकार्टात सर्व अपात्र सदस्यांसह आपिल दाखल करणार असल्याचे उपसरपंच सुनिल अब्दागिरे यांनी सांगितले