फलटण चौफेर दि १४ फेब्रुवारी २०२५ साखरवाडी (ता. फलटण) येथे बुद्ध विहारासाठी प्रशासनाने तातडीने जागा उपलब्ध करून देण्यासाठी लेखी निर्णय दिला नाही तर यावर्षीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साखरवाडीत साजरी केली जाणार नाही. तसेच या पुढच्या काळात येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशारा निवेदनाद्वारे आंदोलनकर्त्या भीमसैनिकांनी फलटणचे प्रांताधिकारी डॉ. विकास व्यवहारे यांना दिला आहे. साखरवाडी येथील बुद्ध विहारासाठी प्रशासनाने जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी तीन दिवसांपासून प्रांत कार्यालयाच्या प्रवेशद्वारालगत ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनाची पुढील दिशा निश्चित झाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले. गत २६ वर्षांपासून बुद्ध विहारासाठी साखरवाडी येथील भीमसैनिक जागेची मागणी करत आहेत. प्रशासनाने बुद्ध विहारासाठी जागा देण्याबाबत तातडीने लेखी निर्णय दिला नाही तर यावर्षी साखरवाडीत डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीचा सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही. त्याचबरोबर आगामी ग्रामपंचायतीसह सर्वच निवडणुकांवर साखरवाडीतील संपूर्ण दलित समाज बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.