फलटण चौफेर दि २१ फेब्रुवारी २०२५
१९ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्र तसेच भारतभर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या जयंती निमित्ताने फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने विविध उपक्रमांचे आयोजन करून शिवजयंती मोठ्या जल्लोषात आणि भक्तिभावाने साजरी केली.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयातील पदवी व पदविका विभागातील विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन महात्मा फुले चौक येथून जनजागृती रॅलीने केली. या रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारधारेचे, सामाजिक ऐक्याचे आणि राष्ट्रसेवेचे संदेश देणारे फलक हाती घेतले होते. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपतींच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य मा. श्री. शिरीष दोशी उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एन. जी. नार्वे, पदवी व पदविका विभागाचे विभागप्रमुख आणि महाविद्यालयातील अन्य प्राध्यापक वर्ग देखील उपस्थित होता.
यानंतर शहरातील सोमवार पेठ, मलटण, महात्मा फुले चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जिंती नाका यासह विविध प्रमुख भागातून विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर घोषणाबाजी करत भव्य रॅली काढली. या रॅली दरम्यान विविध महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली. यामध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश होता.
रॅली पूर्ण झाल्यानंतर महात्मा फुले चौकात सर्व विद्यार्थी एकत्र झाले आणि जनजागृतीपर घोषणा देत उत्साहाने सामील झाले. त्यानंतर सर्वांना अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण येथे आयोजित मुख्य व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी नेण्यात आले.
महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या व्याख्यानात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर सखोल चर्चा झाली. यामध्ये शिवरायांची युद्धनीती, प्रशासन व्यवस्था, लोककल्याणकारी धोरणे आणि त्यांचा आदर्श विचार विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आला. या व्याख्यानाला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एन. जी. नार्वे, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक व महाविद्यालयातील कर्मचारी यांना अल्पोपहार देण्यात आला आणि मोठ्या उत्साहात या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या यशस्वी कार्यक्रमाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटणचे अध्यक्ष आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिलचे सर्व सदस्य, तसेच प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम यांनी आयोजकांचे आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.या प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थी वर्गाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्श विचारांचे आणि त्यांच्या जीवनकार्याचे प्रेरणादायी दर्शन घडते आणि त्यातून सामाजिक जाणीव वाढीस लागते. अशा उपक्रमांच्या माध्यमातून महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे.