फलटण चौफेर दि २७ नोव्हेंबर २०२४
हिंगणगाव, ता. फलटण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटण मधील चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दाखल झाल्या आहेत. दहा आठवडे चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची विविध प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना दाखवली जाणार आहेत.
हिंगणगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाला उद्यानकन्यांनी भेट दिली. त्यावेळी सरपंच दीपिका संदीप भोईटे, उपसरपंच स्वाती पांडूळे, कृषी अधिकारी कुंडलिक नेवसे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व समस्त ग्रामस्त मंडळ हिंगणगाव यांनी उद्यान कन्यांचे स्वागत केले.
कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रात्यक्षिकांवर आधारित उपक्रम राबविला जातो. यादरम्यान विद्यार्थी प्रत्यक्ष गावामध्ये वास्तव्य करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांचा जीवनमान, सामाजिक व आर्थिक स्तर, संबंधित गावातील पिक पद्धती अशा विविध गोष्टींचा अभ्यास करणार आहेत. तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती आधारित उद्योग व्यवसाय व इतर हवामानाविषयी जास्तीत जास्त माहिती विविध ॲपद्वारे कशी संपादित करता येईल, याबाबत उद्यान कन्या कदम साक्षी,कदम तेजस्विनी, जगताप नेहा, करे संजना, करे साक्षी, कांबळे स्नेहल या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमामध्ये शेवटच्या चार आठवड्यात उद्यानकन्या कृषी आधारित उद्योगांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव घेतील. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.डी.निंबाळकर सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. जे.व्ही.लेंबे, व प्रा. ए. आर.पाटील, कार्यक्रम समन्वयक प्रा. ए.डी.पाटील यांचे विद्यार्थिनींना मार्गदर्शन लाभणार आहे. ग्रामीण भागात शेती करत असताना दररोज भेडसावत असलेल्या समस्यांचे निराकरण या उद्यान कन्यांकडून करण्यात येत असते. त्यामुळे शेतकऱ्यांमधून या उद्यान कन्यांचे स्वागतच होत असते. त्याचप्रमाणे त्या दिवशी संविधान दिन असल्यामुळे तो दिवस त्यानी प्राथमिक शाळेमध्ये जाऊन छान साजरा केला. त्यामध्ये त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मानवंदना दिली आणि संविधान म्हणून हा दिवस साजरा केला. तेथील मुख्याध्यापक जाधव सर तसेच शिक्षक भोसले सर, पोरे सर नेरकर मॅडम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.