फलटण चौफेर दि २१-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर सोमवारी सायंकाळी राजगड पोलिसांनी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घेऊन जाणारे वाहन ताब्यात घेतले. यातील रक्कम ५ कोटींच्या आसपास असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही रक्कम कोणाची आहे आणि ती कुठे नेली जात होती, याबाबत तपास सुरु आहे.
प्राप्त माहितीनुसार, राजगड पोलिसांना पुणे-सातारा रस्त्याने मोठी रोख रक्कम वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी खेड-शिवापूर टोल नाक्यावर सापळा रचला. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एक संशयास्पद वाहन टोल नाक्यावर आले आणि तपासणी केल्यानंतर त्यात मोठी रोख रक्कम असल्याचे उघड झाले. पोलिसांनी संबंधित वाहन आणि त्यातील चार जणांना ताब्यात घेतले आहे.या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. रोख रक्कम आणि वाहनातील व्यक्तींची चौकशी सुरू असून, शहाजी नलावडे नावाच्या व्यक्तीची ओळख पटली आहे. तो महायुती सरकारमधील एका बड्या नेत्याचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे.तपास अधिकृतपणे सुरू असून, पुढील तपासणीदरम्यान या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.