फलटण चौफेर दि२३: खंडाळा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक उर्मिला अशोक गलांडे (वय ४७) आणि त्यांच्या कार्यालयातील कंत्राटी प्रशिक्षणार्थी स्विटी उर्फ साक्षी शिवाजी उमाप (वय २८) यांना लाच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने लोणंद येथील मिळकतीवरील सत्ता प्रकार बदलण्यासाठी अर्ज सादर केला होता, ज्यासाठी उपअधीक्षक गलांडे यांनी १ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर रक्कम ७५ हजार ठरविण्यात आली.तक्रारदाराने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी नियोजित सापळा रचून कंत्राटी प्रशिक्षणार्थी स्विटी उमाप यांना ७५,०००/- रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. यानंतर उपअधीक्षक उर्मिला गलांडे आणि स्विटी उमाप यांच्या विरोधात खंडाळा पोलीस ठाणे, जिल्हा सातारा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.सदर कारवाई पोलीस उप-अधीक्षक राजेश वसंत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, यामध्ये पो.हवा. नितीन गोगावले, पो.कॉ. विक्रमसिंह कणसे, म.पो.कॉ. स्नेहल गुरव, आणि चा.पो.हवा. अजित देवकर यांनी सहभाग घेतला.