फलटण चौफेर दि ९ तरडगाव, फलटण तालुक्यातील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावरील तरडगाव येथे सध्या सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी वारंवार होत आहे.यामुळे विस्कळीतपणा निर्माण होवून अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.पुलाच्या एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्याने ही समस्या रोजची बनली आहे. दुसऱ्या बाजूच्या रस्त्याचे काम लवकर पूर्ण करून पुलाच्या दोन्ही बाजूने वाहतूक सुरू करावी अशी मागणी होत आहे.
पुढील जुलै महिन्यात पालखी सोहळा हा तरडगाव मुक्कामी येत आहे. यामुळे पुलाचे काम वेगाने सुरू आहे.अशातच पावसाचे दिवस सुरू झाल्याने पुलाचे सर्व काम पूर्ण होणार नसल्याचे दिसते.मात्र तरी देखील पालखी काळात गैरसोय होवू नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
सध्या बसस्थानक येथे एकेरी वाहतूक सुरू असल्याने दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.अरुंद रस्त्यामुळे मार्गावरून जड वाहनांची वाहतूक करणे जिकिरीचे बनत आहे.अशा वाहनामुळे गर्दी होवून दूरवर वाहंनाच्या लांब रांगा लागत आहेत.यामुळे स्थानिक नागरिक , दुचाकीस्वार यांना रस्ता ओलांडताना कसरत करावी लागत आहे.तर प्रवासासाठी थांबलेल्या प्रवाशांची देखील मोठी गैरसोय होत आहे.
काही दिवसांपूर्वी पुलाच्या दुसऱ्या बाजूच्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ते पूर्ण झाल्यावर दोन्ही बाजूने वाहतूक सुरू झाल्यास वाहतूक कोंडी दूर होईल. पालखी काळात आवश्यक सुविधा देण्यासाठी सबंधित विभागास कार्यरत रहावे लागणार आहे. मात्र सध्या पावसाळा सुरू झाला आहे. त्याचा अडथळा वारंवार निर्माण झाल्यास रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या सर्वांची गैरसोय दूर करण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूने वाहतूक सुरू करण्यासाठी लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.