शिक्षण ही सतत बदलणारी प्रक्रिया आहे, समाजासमोर निर्माण झालेल्या नवीन समस्यांना तोंड देण्यासाठी असे बदल आवश्यक असतात. पण शिक्षणाचे आजचे वास्तव विदारक आहे, ही वस्तुस्थिती, आजचे शिक्षण विद्यार्थ्यांना यशस्वी जीवन जगण्यासाठी सक्षम बनवते का ?शिक्षणामुळे नोकरी मिळेल, आणि आयुष्यात सुखात जगता येईल, हे स्वप्न उराशी बाळगून लाखो तरुण उच्च शिक्षण घेत आहेत, दुर्दैवाने त्यांचे हे स्वप्न पुरे होत नाही. पारंपरिक व्यवसायापासून तुटलेली नाळ पुन्हा जोडणे कठीण बनते, अशा द्विधा अवस्थेत सापडलेल्या आजचा तरुणांना उच्च शिक्षण घेऊनही, नाईलाजाने शेती करावी लागत आहे. हे वास्तव असले तरी नोकरी मिळवणे, हे शिक्षणाचे अंतिम ध्येय नसून, चांगले जीवन जगणे हे आहे.
प्राप्त केलेल्या ज्ञानाचे, उपयोजन करण्याची क्षमता विकसित करणे म्हणजे शिक्षण.
शाळा हे शिक्षणाचे केंद्र मानले जाते, त्याचप्रमाणे शाळेकडून अनेक अपेक्षा व्यक्त केल्या जातात, शाळा हे आनंददायी ज्ञान केंद्र व्हावे, दुर्दैवाने अनेक शाळा हा निकष पूर्ण करीत नाहीत. शाळेविषयी विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण न होता, विद्यार्थ्यांना आनंद झाला पाहिजे, लहानपणापासूनच शाळेविषयी मुलांच्या मनात भीती निर्माण होते, ती भीती उत्पन्न होऊ न देणे ही पालकांची जबाबदारी असते. जून मध्ये शाळा सुरू झाली की सर्वच पालक आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी येतात, त्यांपैकी बहुतांश मुले रडतच शाळेत येत असतात, पालक समजून न घेता मुलांना शाळेच्या दिशेने ओढून आणतात, साहजिकच मुलांच्या मनात शाळेविषयी भीती निर्माण होते.
शाळा, ही नुसती शाळा नसून, समाज विकासाचे एक मुख्य साधन मानले जाते,
कोणत्याही शिक्षण संस्थेच्या ध्येय वाक्यातून त्यांच्या कार्याची दिशा स्पष्ट होते, त्यास अनुसरूनच त्या संस्थेच्या शाळातून कार्य चालायला हवे, शासनाने दिलेला अभ्यासक्रम शिकवणे हे तर सर्व शाळांनी करावयाचेच काम आहे, परंतु नेमके काय साध्य करावयाचे आहे, हे या वाक्यात अंतर्भूत असते,
ही एक त्या शाळेची किंवा संस्थेची एक परंपरा तयार होते, त्यातूनच शाळेचा नावलौकिक होतो, त्या शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबर आपण ज्या परिसरात राहतो, जगतो, त्या परिसरात घडणाऱ्या घटनांचे आणि त्या जोडलेल्या आपल्या जीवनाचे शिक्षण घ्यायचे असते, शिक्षण आणि जीवन यातून वास्तवातले प्रश्न कसे सोडवायचे, खरे खरे आयुष्यात जे प्रश्न नेहमी पडणार त्याचे शिक्षण शालेय जीवनात मिळायला हवं !
जीवनाची खरी ओळख शाळेत व्हायला हवी.
अशी ओळख होण्यासाठी शालेय जीवनातच भरपूर अनुभव मिळायला हवेत.
डॉ. ए. पी.जे अब्दुल कलाम आपल्या शाळेविषयी म्हणतात...
आमच्या शाळेची इमारत आकर्षक नव्हती, तिथे सोयी, सुविधा अपुऱ्या होत्या, पण तरीही ती खूप छान होती. मुलांना शिक्षक आवडत असत, आणि त्यांनाही शिकवायला आवडत असे, प्रत्येकाने अभ्यासात उत्तम कामगिरी केली पाहिजे, यावर त्यांचा कटाक्ष असे, आम्ही केवळ परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी अभ्यास करू नयेत, असे ते म्हणत ते शिकवत असलेल्या विषयाची आम्हाला गोडी लागावी, अशी त्यांची इच्छा, अशी माझी शाळा म्हणजे आनंद तीर्थ होतं.
कोणतंही चाकोरीबद्द शिक्षण न घेता या शाळांमधील मुले आपापल्या जीवनात यशस्वी होतात, या पाठीमागे त्या शाळेत राबवली जात असलेली अध्ययन आणि मूल्यमापन पद्धत ही होय.
कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्यागावर खेडोपाडी शाळा उभ्या केल्या, वाढवल्या, त्यासाठी जवळ होते ते सर्व खर्च केले, कारण मुलांना शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे हा त्या पाठीमागचा उद्देश होता.
दुर्दैवाने अलीकडे शाळा स्वतःच्या फायद्यासाठी निघू लागल्या, विद्यार्थ्यांकडे, पालकांकडे, ग्राहक म्हणून ते पाहू लागले, आणि शाळेच्या माध्यमातून एक वेगळच अर्थशास्त्र निर्माण झालं.
शाळा असावी शाळेसारखी
नकोत नुसत्या भिंती
तिथे असावा प्रेम जिव्हाळा
नकोत नुसती नाती.
श्री. रविंद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी. ता. फलटण. जि. सातारा. फो. ९९७०७४९१७७

