Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आचारसंहितेमुळे लोककलावंताच्या आयुष्याचा तमाशा

 



तरडगाव : नवनाथ गोवेकर

मागील वर्षी कोरोना काळानंतर पहिल्यांदाच संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात यात्रा सुरु झाल्याने महाराष्ट्राची लोककला आणि लोकपरंपरा असलेल्या तमाशा फडांना पुन्हा एखादा सुगीचे दिवस आले होते.  गाव मालकांची फडावर गर्दी दिसून येत होती. मागील दोन वर्षांपूर्वी कोरोना विषाणूच्या थैमानामुळे तमाशा फड मालकांना व कलावंतांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले होते. गावोगावच्या यात्रा रद्द झाल्यामुळे फडमालकांसह कलावंतही हतबल झालेले दिसले. यावर्षी देखील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका असल्यामुळे आचारसंहिता लागू असून रात्रीच्या कार्यक्रमावर निर्बंध घालण्यात आले आहेत यामुळे लोककलावंताच्या समोर पुन्हा एक नवीन संकट उभे राहिले आहे.


काळज ता. फलटण येथील तमाशा केंद्र महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध तमाशापंढरी म्हणुन ओळखली जाते. जवळपास ५० फडमालक दरवर्षी या तमाशापंढरीत येऊन आपला तळ ठोकतात. मात्र कोरोणा विषाणूच्या थैमानामुळे तमाशा कार्यालय सुरु झालेच न्हवती आणि गावमालक बारी ठरवण्यासाठी या तळांकडे फिरकलेच नाहीत त्यामुळे खाजगी सावकारांकडून कर्ज घेऊन उभे केलेले तमाशा फड फार मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडल्याचे दिसून आले होते. कलावंतांना दिलेल्या उचली, तमाशा पंढरीतील जागेच भाडं, सावकारांकडून घेतलेलं कर्ज व पोट भरण्यासाठी चाललेली धडपड अशा चारी बाजूंनी तमाशा फड मालकांवर संकटे हमला करून आली होती. यावर्षी देखील काहीशी अशीच परिस्थिती असल्याचे फड मालकांकडून सांगण्यात येत आहे.


गतवर्षी ग्रामीण भागामध्ये यात्रा मोठया जल्लोषात सुरु झाल्या. त्यामुळे तमाशा कार्यक्रम ठरवण्यासाठी गावमालकांची तमाशा फाडला भेटी वाढल्या होत्या. यात्रा गर्दीने फुलल्या असून, तमाशा फडाच्या चांगल्या सुपाऱ्या मिळत असल्याने या कलाकारांनी समाधान व्यक्त केले होते. 


यावर्षी मात्र लोकसभेची सार्वत्रिक 

निवडणूक असल्यामुळे रात्रीच्या कार्यक्रमावर निर्बंध आले असल्याने फक्त दिवसाचेच कार्यक्रम ठरवले जात आहे त्यामुळे तमाशा फड मालकांच्या आर्थिक नुकसान होत आहे. एका गावात दुपारी आणि रात्रीचे कार्यक्रम केल्यामुळे आर्थिक बचत होऊन तमाशा फड मालकांना चांगलाच आर्थिक फायदा होतो. मात्र आता एका गावात एकाच वेळी तमाशा करावा लागत आहे. रात्रीचे कार्यक्रम बंदच होऊन इतर खर्च मात्र तसेच आहेत. त्यामुळे फड मालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.


काळज तमाशा पंढरीमध्ये या सुमारे ४० छोटेमोठे फडमालक आले आहेत. एका तमाशा फडामध्ये जवळपास १५० लोकांचा संच एका फडा मध्ये असतो. त्यामध्ये १५-२० तरुणी असतात. तसेच हळीची गवळण गाणारे, सरदार (कृष्ण), मावशी (नाचा), मावशीशी बोलणारी बाई, ढोल व हलगी वाजविणारे, टाळ, तुणतुणे आणि पेटी वाजविणारा यांसह ४ ते ५ सोंगाडे अशा पद्धतीने प्रत्यक्ष स्टेजवर नाचणारे, गायक, वादक कलाकार असतात तसेच पडद्यामागे ५० ते ६० कारागीर काम करत असतात. एका सिजन मध्ये काळज तमाशा पंढरीमधुन जवळपास पाच कोटी रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे स्थानिक व्यवसायिक यांचे व्यवसाय देखील तेजीत असतात. यावर्षी तमाशा फड काळज येथे दाखल झाले असून सर्व फड मालकांना, कलावंतांना तसेच स्थानिक व्यवसायीकांना पुन्हा एखादा सुगीचे दिवस येतील अशी आशा लागून राहिली आहे.



गौतमी पाटीलचा तमाशा व्यवसायावर फारसा परिणाम नाही. 


महाराष्ट्रातील आघाडीची नृत्यांगना म्हणून गौतमी पाटील ची ओळख आहे. तिच्या कार्यक्रमाला अफाट गर्दी आजपर्यंत झालेली संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. फक्त वैयक्तिक कार्यक्रमासाठी गौतमी पाटील च्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मात्र गावच्या यात्रेच्या कार्यक्रमात तमाशालाच पसंती व मान असल्याने तमाशा व्यवसायावर गौतमी पाटीलचा परिणाम दिसून येत नाही. 


यावर्षी रात्रीच्या कार्यक्रम बंद असल्याने गौतमी पाटील चे कार्यक्रम दिवसाचे आयोजित केले जात आहेत. याचा काहीसा परिणाम हा तमाशावर होऊ शकतो.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.