फलटण चौफेर दि १३संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहोळा मार्ग, पालखी तळ, विसाव्याची ठिकाणे यांची प्रत्यक्ष पाहणी आणि सोहळ्याच्या वाटचाली दरम्यान आरोग्य, स्वच्छता, पाणी, सुरक्षा आदी बाबींची माहिती घेतल्यानंतर आळंदी देवस्थान कमिटीने समाधान व्यक्त केले असून काही सूचना संबंधीत शासकीय यंत्रणांना केल्या आहेत.
आषाढीवारीसाठी आगामी जून महिन्यात आळंदीहुनपंढरपूरकडे जाणाऱ्या संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज आळंदी देवस्थान कमिटीच्यावतीने पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ, प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ चोपदार, संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यात फलटण येथे स्थानिक पत्रकारांशी बोलताना प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप यांनी वरीलप्रमाणे मत व्यक्त केले आहे.
पालखी मार्गाचे काम अंतीम टप्प्यात सुरु असून आगामी २ महिन्यात जवळपास ९० टक्के पर्यंत सदर काम पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करताना विविध ठिकाणच्या पालखी तळांपैकी अनेक ठिकाणी किरकोळ दुरुस्त्यांची अपेक्षीत कामे पूर्ण झाली आहेत, उर्वरित होतील याची ग्वाही संबंधीत यंत्रणांनी दिली असल्याचे, स्वच्छता व आरोग्य विषयक, पाणी पुरवठा, सुरक्षा वगैरे बाबींची व्यवस्था नेहमीप्रमाणे करण्याचे आश्वासन महसूल, पोलिस, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम यांच्यासह सर्वच शासकीय यंत्रणांनी दिले असून त्याची पूर्तता होईल अशी अपेक्षा प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप यांनी व्यक्त केली आहे.
सर्व ठिकाणी सर्व संबंधीत शासकीय यंत्रणांचे अधिकारी भेटत असून सर्व शासकीय यंत्रणांची कामे वेळेत पूर्ण होतील अशी अपेक्षा विश्वतांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान फलटण येथे पालखी तळासाठी शासन कायम स्वरुपी जागा खरेदी करुन तेथे पालखी तळ उभारण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आल्यानंतर येथील पत्रकारांनी नीरा उजवा कालव्या लगत असलेली श्रीराम कारखान्याने विक्री केलेली जमीन विकत घेऊन तेथे पालखी तळ उभारण्याचा आणि दुसरा साई मंदिर समोरील एका ट्रस्टच्या जागेचा प्रस्ताव असे २ प्रस्ताव लक्षात घेऊन आळंदी देवस्थान विश्वस्त समिती, देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी प्रस्तावित दोन्ही जागांची पाहणी केली.
प्रशासनाने साई मंदिरासमोरील एका ट्रस्टच्या जागेचा प्रस्ताव दिला आहे, तर शहर व तालुक्यातील पत्रकार यांनी श्रीराम सहकारी साखर कारखान्याने विक्री केलेल्या जागेचा प्रस्ताव दिला आहे.
देवस्थान कमिटीने दोन्ही जागांची पाहणी केली असून श्रीराम कारखान्यालगतच्या जागेस प्रथम पसंती दर्शविली आहे. सदर जागा शहरालगत असूनही शहराच्या व्यवस्थेवर, वाहतूक व अन्य कोणत्याही सुविधेवर ताण येणार नाही, लगत नीरा उजवा कालवा असल्याने पाण्याची मुबलक व्यवस्था होऊ शकते, माऊली या तळावर लोणंद (दक्षिण) बाजूने प्रवेश करु शकतील आणि उत्तर बाजूने थेट पालखी महामार्गावर निघणार असल्याने अत्यंत सोयीचा, प्रशस्त, पाण्याची सुविधा असलेला उत्तम पालखी तळ होईल आणि वर्षभर उत्तम क्रीडांगण म्हणून त्याचा वापर होऊ शकेल ही बाब विश्वस्त मंडळाच्या निदर्शनास आणून देण्यात आली, यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले, उप विभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्यासह अन्य शासकीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
