फलटण चौफेर दि २०
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण येथील विद्यार्थी, प्राध्यापक,प्राध्यापकेतर कर्मचारी यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौक येथे शिवछत्रपतींच्या प्रतिमेला, एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्नमेंट कौन्सिल सदस्य डॉ.पार्श्वनाथ राजवैद्य व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र नार्वे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून स्मारक चौक ते अभियांत्रिकी महाविद्यालय अशी बाईक रॅली काढण्यात आली.
यावेळी फलटणमधील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. महाविद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवव्याख्याते महेश पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर महेश पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य विशद केले व छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी युवा वर्गावरती आहे व वर्गाने हे काम अतिशय निष्ठेने व प्रामाणिकपणे करावे असे आवाहन केले. शिवजयंती साजरी करत असताना उपक्रम अशा पद्धतीने राबवावेत की त्या उपक्रमांच्या माध्यमातून शिवरायांचे विचार व शिवरायांनी केलेले कार्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवता येईल असेच उपक्रम राबवावेत असे आवाहन त्यांनी उपस्थित युवा वर्गाला केले.