फलटण चौफेर दि २०
फलटण तालुक्यातील ज्या खातेदारांनी कुळ कायदा शर्तीनुसार जमिनी खरेदी केल्या आहेत व ज्यांनी सक्षम प्राधिकारी यांची परवानगी न देता जमिनी हस्तांतरित केल्या आहेत अशा खातेदारांनी शेती वापरासाठी शासन मूल्याच्या ५० टक्के व बिनशेती वापरासाठी ७५ टक्के रक्कम स्वतःहून भरून शर्तभंग नियमानुकूलित करावी अन्यथा अशा स्वरूपाच्या जमिनी शासन जमा करण्याचा इशारा फलटणचे तहसीलदार डॉ अभिजीत जाधव यांनी दिला आहे
तहसीलदारांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम १९४८ (कुळकायदा) मधील तरतुदीनुसार कुळाला जमीन मालकाकडून नियमानुसार जमीन मिळताना ती नवीन अविभाज्य शर्तीवर / भोगवटादार वर्ग-२ धारणाधिकाराने मिळते व या कायद्याच्या कलम ४३ नुसार त्याचे हस्तांतरणावर निर्बंध येतात याचा मुळ हेतू हाच की कुळांनी या जमिनीची सहजरित्या विक्री करुन पुन्हा भूमीहीन होऊ नये.सन २०१६ पूर्वी सक्षम प्राधिकारी यांची पुर्व परवानगी न घेता कलम ४३ च्या शर्तीस पात्र कुळकायदा जमीन हस्तांतरण केलेस ती या कायद्याच्या कलम ८४-क च्या तरतुदींनुसार शासन जमा होत असे. तथापि काळाच्या ओघात शासनामार्फत कुळकायद्याच्या तरतुदींमध्ये अनेक बदल करणेत येऊन हा कायदा लोकाभिमुख बनवणेत आला आहे. या कायद्यामधील कलम ८४-क मध्ये दुरुस्ती केलेने कलम ४३ च्या शर्तीस अधीन असणारी जमीन सक्षम प्राधिका-याच्या परवानगीविना हस्तांतरण झाली असलेस शेती वापरासाठी रेडी रेकनरच्या (शासकीय मूल्य) ५० टक्के रक्कम भरुन आणि बिनशेती वापरासाठी रेडी रेकनरच्या ७५ टक्के रक्कम भरुन असा शर्तभंग आता नियमानुकूल करुन घेणेचे अधिकार तहसिलदारानां देणेत आले आहेत.
सन २०२३/२४ आर्थिक वर्षामध्ये तहसिल कार्यालय फलटण येथे कुळकायदा ४३ चा शर्तभंग नियमानुकूल करणेकामी ३१जानेवारी २०२४ अखेर २० प्रकरणे दाखल होती. यापैकी १७ प्रकरणांत आदेश देऊन एकूण १ कोटी ५८ लाख १५ हजार रकमेचा दंड ठरवून देणेत आला असून यापैकी आज अखेर एकूण ५३ लाख ६९ हजार ९०० रुपये रक्कम शासनाचे तिजोरीत चलनाने जमा करणेत आली आहे. तसेच विहीत मुदतीत दंडाची रक्कम न भरणा-या खातेदारांची जमीन ही शासन जमा करणेची कार्यवाही देखील सुरु आहे.या व्यतिरिक्त क्षेत्रीय स्तरावर मंडळ अधिकारी, आणि तलाठी यांचेमार्फत अशी कुळकायदा शर्तभंगाची प्रकरणे शोधून दंडात्मक कारवाई करणेची मोहिम तहसिल कार्यालय फलटण यांचे स्तरावर सुरु करणेत आली आहे भविष्यात उत्तरोत्तर मुल्यांकन वाढत जात असलेने अशा प्रकारे सक्षम प्राधिकारी यांची परवानगी न घेता कुळकायदा शर्तीची जमीन खरेदी घेतलेल्या खातेदारांनी तहसिल कार्यालयाकडे स्वतःहून तात्काळ संपर्क साधून असा शर्तभंग नियमानुकूल करुन घेण्याचे आवाहन तहसीलदार डॉ अभिजीत जाधव फलटण यांच्याकडून करण्यात आले आहे