फलटण चौफेर दि २९
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. २८ फेब्रुवारी हा दिवस थोर शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांनी रमण इफेक्ट या लावलेल्या शोधा प्रित्यर्थ कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण भारत देशामध्ये साजरा केला जातो. या दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये प्राचार्य रवींद्र येवले यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.नरेंद्र नार्वे होते.
उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना प्राचार्य रवींद्र येवले यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन हा मानवाच्या समस्या सोडवण्यासाठी अंगीकारणे अत्यंत आवश्यक असल्याचे विशद केले. मानवाने आयुष्य जगत असताना जर वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारला तर दैनंदिन जिवनामध्ये येणाऱ्या समस्या सहजपणे सोडवता येतात असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
रवींद्र येवले यांनी आपल्या विनोदी शैलीमध्ये अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले. यावर्षीची विज्ञान दिनाची थिम म्हणजे भारत देशातील तंत्रज्ञान वापरून भारत देशाची प्रगती साध्य करणे या थीमला उद्देशून या देशांमध्ये उपलब्ध असणारे तंत्रज्ञान कशा पद्धतीने जगाला मार्गदर्शक ठरत असून त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून आपण विकसित भारत घडवू शकू याबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाची प्रस्तावना करत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. नरेंद्र नार्वे यांनी सि. वी रमण यांच्या कार्याचा आढावा घेत रमण इफेक्ट व त्याचे आज विविध क्षेत्रांमध्ये असणारे उपयोग याबाबत विद्यार्थ्यांना अवगत केले. या शोधामुळे भारत देशाची जगामध्ये वाढलेली प्रतिमा व या शोधामुळे भारताने जगाला दिलेले एक अमूल्य बक्षीस यामुळे सी व्ही रमण यांना भारतरत्न नोबेल पारितोषिक अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आल्याचे सांगितले.
प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा.शांताराम काळेल यांनी केली. आभार प्रदर्शन प्रथम वर्ष डिप्लोमा विभाग प्रमुख प्रा.सोपान काळे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी प्रा.दत्तात्रय शिंदे यांनी मेहनत घेतली.