फलटण चौफेर दि २१
चालू रब्बी हंगामातील शेतमाल विकण्याची घाई शेतकरीवर्गाने करू नये. उत्पादित शेतमाल वाळवून व स्वच्छ करून वखार महामंडळाच्या गोदामात आणून ठेवावा. बाजारातील शेतमालाचे भाव वाढल्यानंतर शासकीय गोदामातील शेतमालाची विक्री केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार असल्याचे सांगत गोदामाच्या भाड्यात शेतकऱ्यांना ५० टक्के सूट देण्यात आली असून वखार महामंडळाच्या सुविधांचा लाभ व्यापारी व शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन वखार महामंडळाचे साठा अधिक्षक समीर नाडगौडा यांनी केले.येथील वखार महामंडळाच्या गोदाम परिसरात आयोजित जिल्हास्तरीय शेतकरी मेळाव्यात नाडगौडा बोलत होते. यावेळी कॉसमॉस बँक व्यवस्थापक प्रवीण देशमुख, राज्य सहकार महामंडळ शेतमाल तारण व्यवस्थापक प्रशांत चासकर, फोर्टिस कंपनीचे विभागीय व्यवस्थापक महेंद्र हजारे, तंत्रज्ञान व्यवस्थापक रणदिवे, श्रीमती शीला घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
व्यापारी व शेतकरीवर्गाला मार्गदर्शन करताना समीर नाडगौडा म्हणाले, शेतकऱ्यांना विविध सवलती देण्याचे वखार महामंडळाचे धोरण आहे. उत्पादित शेतमाल शासकीय गोदामात ठेवणाऱ्या कंपन्यांनाही २५ टक्क्यांची सूट व ९ टक्के व्याजदराने तात्काळ कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतमालाचे बाजारभाव वाढीनंतर संबंधितांनी आपला शेतमाल विकून आर्थिक उत्पन्न वाढवावे.
या शेतकरी कार्यशाळेत गोदाम उभारणी, व्यवस्थापन तंत्रज्ञान, गोदाम विषयक शासनाच्या विविध योजना आदींची माहिती देण्यात आली. कृषी विभाग, आत्मा यंत्रणा, महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जागतिक बँक अर्थसहाय्यीत प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शेतकरी कार्यशाळा आयोजित केली होती.
या कार्यशाळेस विविध गावातील शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, महिला बचत गट फेडरेशन, सहकारी संस्था, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, महिला आर्थिक विकास महामंडळ फलटण तालुका व्यवस्थापक, तालुक्यातील शेतकरी, व्यापारी उपस्थित होते.