साखरवाडी(गणेश पवार)
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दिनांक दि. २० जुन २०२३ रोजी फलटण तालुक्यामध्ये प्रवेश करणार आहे. फलटण तालुक्यामध्ये माऊलींच्या पालखीचे एक उभे रिंगण (चांदोबाचा लिंब), तीन मुक्काम (तरडगांव, फलटण, बरड) व आठ विसावे आहेत. सदरच्या श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारीच्या अनुषंगाने फलटण प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असल्याची माहिती फलटण उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त फलटण तहसिल कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी फलटण उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, तहसिलदार समीर यादव, निवासी नायब तहसिलदार डी. एस. बोबडे, महसूल नायब तहसीलदार एन. डी. काळे, नायब तहसीलदार तुषार देशमुख उपस्थित होते.
यावेळी बोलतांना फलटण उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले की, फलटण तालुक्यामध्ये तीनही पालखी तळांच्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत आपत्कालीन व्यवस्थापन केंद्रे (EOC) स्थापन केली असून सर्व विभागांचे प्रतिनिधी त्यामध्ये समाविष्ट आहेत. सदरची केंद्रेही त्याठिकाणी पालखी मुक्कामावेळी सर्व विभागांमध्ये समन्वयाचे काम करुन वारकऱ्यांना सर्व सोयी सुविधा मिळतील याची दक्षता घेतील
फलटण तालुक्यामध्ये वारकऱ्यांना पाणी पुरवठ्यासाठी सुमारे ६५ शासकीय टँकर्सची व्यवस्था केली असून दिंड्यांसोबत असणाऱ्या ४५०-५०० टँकर्ससोबत सर्व ठिकाणी पाणी पुरवठा करण्याचे नियोजन ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे. फलटण तालुक्यामध्ये २३ ठिकाणी टँकर भरण्यासाठी ३४ पॉईंट उपलब्ध करण्यात आले असून प्रतिदिन ७०० पेक्षा जास्त टँकर भरण्याची क्षमता आहे. तसेच पालखी मार्गावरील पाणी शुद्धीकरणासाठी १९ पथके नियुक्त केली आहेत. सर्व ठिकाणची पाण्याची तपासणी आरोग्य विभागामार्फत करण्यात आली आहे.
तरडगांव, फलटण व बरड मुक्कामी पालखी असताना प्रत्येक ठिकाणी १५०० तात्पुरती शौचालये उभारण्यात येत आहेत. तात्पुरत्या शौचालयांच्या स्वच्छतेसाठी वेगळे कर्मचारी नेमण्यात आले असून पाणी पुरवठ्यासाठीही वेगळ्या टँकर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. यामधील काही तात्पुरती शौचालये इतरत्र मुक्कामी असणान्या दिंड्यांच्या ठिकाणी व विसाव्यांच्या ठिकाणीही ठेवण्यात येणार आहेत. मागील वर्षापेक्षा ५०० तात्पुरती शौचालये अधिक उभारण्यात येत आहेत.
पालखी तळाच्या ठिकाणी मुक्कामापुर्वी, मुक्कामादरम्यान व मुक्कामानंतरच्या स्वच्छतेसाठी संबंधित ग्रामपंचायत व नगरपरिषदेने संपुर्ण नियोजन केलेले आहे. जिल्हाधिकारी यांनी पालखी तळ व शौचालयांच्या स्वच्छतेसाठी जिल्हास्तरावरुन अतिरिक्त १५० कर्मचारी उपलब्ध करुन दिलेले आहेत. संपुर्ण पालखी काळामध्ये आरोग्य विभागाकडील १४ स्थिर पथके वारकऱ्यांना सेवा देण्यासाठी नेमण्यात आले आहेत. तसेच दुचाकीवरील १७ आरोग्यदूत पथके वारकऱ्यांना प्रथमोपचाराची सुविधा देतील. पालखी मार्गावर प्रत्येक किलोमीटरला १ रुग्णवाहिका अशा ३३ रुग्णवाहिका ठेवण्यात येणार असून ४ कार्डीयाक रुग्णवाहिका देखील ठेवण्यात येणार आहेत. पालखी काळामध्ये तालुक्यामधील १९० बेड्स वारकऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. तसेच फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये जिल्हास्तरावरुन वेगवेगळ्या तज्ञ डॉक्टरांची नेमणूक पालखी काळासाठी करण्यात आली आहे.
पालखी मुक्काम व टँकर भरण्याच्या ठिकाणी वीजपूरवठा अखंडीत राहील याची दक्षता घेण्यात आली आहे. तसेच वारकऱ्यांना तात्पुरती वीज जोडण्याही सहजरित्या उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. वारकऱ्यांना पायी चालताना उन्हापासून संरक्षणासाठी १७ मंगल कार्यालये व ८ पेट्रोल पंपाच्या ठिकाणी विश्रांतीगृहे तयार करण्यात आली आहेत. त्याठिकाणी तात्पुरती शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
पोलीस विभागामार्फत पालखी सोहळ्यासाठी पुरेसा बंदोबस्त उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. तसेच वारीमधील भुरट्या चोरांच्या बंदोबस्तासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत. महिलांसाठी प्रत्येक तळावर २४X७ कार्यरत राहणारे निर्भया पथक ठेवण्यात येणार आहे. याशिवाय पालखी मार्गावर ८ ठिकाणी बंद पडलेल्या वाहनांना बाजूला करण्यासाठी क्रेनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येक पालखी तळाच्या ठिकाणी २ अग्निशमन वाहने स्थापित केली जाणार असून पोलीसांकडील वाहनांमध्ये ५० अग्निशमन सिलेंडर्स ठेवणेत येणार आहेत.
अशाप्रकारे माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या सोयीसाठी तहसील कार्यालय फलटण येथे २४/७ कार्यरत राहणारे दि. १८ जून ते २३ जून पर्यंत कंट्रोल रूम स्थापित केले असून त्याचा संपर्क क्र. ०२१६६-२२२२१० असा आहे. प्रशासनामार्फत सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे संपर्क क्रमांक असलेची संपर्क पुस्तिका तयार करण्यात आली असून सर्व दिंड्यांना त्या पुस्तिकांचे वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती फलटण उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी यावेळी दिली.