साखरवाडी (गणेश पवार)
फलटण तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वरती अर्ज करून योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन फलटण तालुका कृषी अधिकारी सागर डांगे यांनी केले.
सदर योजनांबाबत अधिक माहिती देताना तालुका कृषी अधिकारी सागर डांगे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत संरक्षित सिंचन सुविधा या घटकाखाली विविध आकारमानाच्या शेततळे अस्तरीकरणासाठी किमान १५ x१५x ३ मीटर (रक्कम रुपये २८,२७५) व कमाल ३०x३०x ३मीटर (रक्कम रुपये ७५) रकमेच्या मर्यादेत अनुदान देय राहील.
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत किमान १५X१५X३ मीटर ( रक्कम रुपये २८,२७५/-) व कमाल ३०x३०x३ मीटर (रक्कम रुपये ७५,०००/-) रकमेच्या मर्यादित अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे यासाठी शेतकऱ्यांना विविध आकारमानाच्या शेततळ्यापैकी कोणत्याही एका आकारमानाच्या शेततळ्याकरिता मागणी अर्ज महाडीबीटी पोर्टलवर करता येईल. यामध्ये जास्तीत जास्त ३४X३४X३ मीटर व कमीत कमी १५X१५X३ मीटर आकारमानाचे इनलेट आऊटलेटसह किंवा इनलेट- आऊटलेट विरहित शेततळे घेता येणार असून शेततळ्याच्या आकारमानानुसार अनुदानाची जास्तीत जास्त रक्कम ७५ हजार इतकी असणार आहे
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडी करीता पात्र ठरु शकत नाहीत, अशा शेतक-यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना असुन किमान ०.२० हेक्टर ते कमाल ६.०० हेक्टर क्षेत्र असणारे शेतकरी यासाठी पात्र आहेत. यामध्ये फळपिके आंबा कलमे व रोपे, पेरू कलमे व सधन लागवड, डाळींब कलमे, कागदी लिंबु, नारळ, सिताफळ, आवळा, चिंच, जांभुळ, अंजिर, चिक्कु, मोसंबी, संत्री, इत्यादी पिकांच्या लागवडीसाठी निर्धारीत अंतरावर लागवड केल्यास संबंधित शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे.
त्याचप्रमाणे ट्रॅक्टर, पावरटिलर आणि ट्रॅकर चलित अवजारे, ठिबक आणि तुषार संच, शेडनेट, पॉलीहाऊस, कांदाचाळ, इ. बाबींचा लाभ घेण्यासाठी देखील शेतक-यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत व या योजनांचा जास्तीत जास्त शेतक-यांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी स्थानिक पातळीवरील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे अवाहन तालुका कृषि अधिकारी सागर डांगे यांनी केले आहे.