साखरवाडी(गणेश पवार)
मुंबई पोलीस भरती मध्ये लेखी परीक्षेत गैरप्रकार झाल्याची बाब नुकतीच उघड झाली असून या प्रकरणात फलटण तालुक्यातील अनेक महाभाग व उमेदवार असल्याची माहिती मिळत असुन या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत असून वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा तपास फलटण येथे येवून करणार असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई पोलीस भरती मध्ये लेखी परीक्षेत गैरप्रकार झाला असून लेखी परीक्षेच्यावेळी पोलिस दलातील अधिकाऱ्यांनी गुगल सर्च करून बटण कॅमेऱ्याच्या माध्यमातून परीक्षेचा पेपर बाहेर पाठवून सार्वजनिक करत मायक्रोफोनद्वारे प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. यासाठी परीक्षार्थीकडून प्रत्येकी १० ते १२ लाख रुपयांची लाच घेण्यात आल्याचे अन्यायग्रस्त परीक्षार्थींनी बोलून दाखवत आहेत. या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अनेक जणांनी भेट घेऊन पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेत झालेल्या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याबरोबरच मुंबई पोलिस भरतीची लेखी परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी करत आहेत.
अनेक सैन्य तसेच पोलिस भरती परीक्षेतील पेपर फुटीचे केंद्र असणारा फलटण तालुका यावेळीही मुंबई पोलिस भरती परीक्षा पेपर फुटीमध्ये आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई पोलिस भरती पेपर फुटीमध्ये फलटण तालुक्यातील तसेच शेजारील तालुक्यातील व जिल्ह्यातील 100 ते 125 विद्यार्थी सहभागी असल्याची माहिती मिळत असून या विद्यार्थ्यांनी फलटण तालुक्यातील अनेक भरती केंद्र चालक यांच्या सहकार्याने या पेपर फुटित सहभाग घेतला होता अशी खात्रीशीर माहिती मिळत आहे.जे उमेदवार लगेचच पैसे देऊ शकत नाहीत अथवा निम्मे पैसे देऊ शकतात अशा उमेदवारांची मूळ शालेय कागदपत्रे केंद्र चालक सिक्युरिटी म्हणून ठेवत असल्याची माहिती मिळत आहे
याप्रकरणी तपासकामी अनेक जणांच्या उचल बांगड्या होणार असून अनेकांची पितळे थोड्या दिवसात उघडी होणार आहेत. फलटण तालुक्यातील कोणा कोणाचा सहभाग आहे तसेच किती विद्यार्थी यात सहभागी आहेत व किती रक्कम पेपर फोडण्यासाठी दिली हे तपासानंतर समजणार आहे. कष्ट करून अभ्यास करून भरती करीता बसणाऱ्या उमेदवारांवर अशा पेपर फुटीच्या प्रकरणामुळे अन्याय होत असल्याची बाब निदर्शनास येत असून अशा पेपर फुटीच्या प्रकरणास कायमचा अंकुश लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे.