तरडगाव(नवनाथ गोवेकर)
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी होत असून २० जून रोजी तरडगाव मुक्कामी आहे. तरडगाव ग्रामपंचायतच्या वतीने उत्तम नियोजन करण्यात आले आहे. आळंदी ते पंढरपूर वारीतील सर्वात मोठा व विस्तीर्ण असा पालखीतळ हा तरडगावमध्ये आहे असे मत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांनी आपल्या पाहणी दरम्यान व्यक्त करून ग्रामपंचायतचे नियोजनाचे कौतुक केले.
तरडगाव ता. फलटण येथे २० जून रोजी पालखी सोहळा मुक्कामी आहे त्या अनुषंगाने संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांनी पालखीतळाची पाहणी केली यावेळी विश्वस्त सुधीर पिंपळे, अभय टिळक, बाळासाहेब चोपदार, रामभाऊ चोपदार, ज्ञानेश्वर वीर, सरपंच जयश्री चव्हाण, उपसरपंच प्रशांत गायकवाड, सदस्य संतोष कुंभार, प्रदीप गायकवाड, दिपक गायकवाड, दिनेश अडसूळ, ऋषिकेश चव्हाण, पोलिस पाटील भरत अडसूळ आदी उपस्थित होते.
तरडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सोहळ्यासाठी स्वच्छ पाणी, स्नानगृहे फिरते शौचालय, वीज अशा अनेक सुविधा देण्यात आल्या असल्याची माहिती ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आली. पालखीतळावरील अनावश्यक विजेचे खांब महावितरणच्या वतीने काढून टाकण्यात आले असून तरडगाव परिसरातील सर्व विजेच्या खांबांवरती बल्ब बसविण्यात येणार आहेत.
लोणंद ते फलटण दरम्यान पालखी महामार्गाचे काम चालू असून पालखी सोहळ्यांला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना संस्थान कमिटीच्या वतीने प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.