साखरवाडी(गणेश पवार)
दहिवडी पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारत बेकायदा वाळू वाहतूक व अवैध जुगार अड्डयावर कारवाई करुन सुमारे ५ लाख आहे. ६८ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी ५ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत दहिवडी पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी रात्री साडेबारा वाजता दहिवडीच्या दिशेने एक डंपर बेकायदा वाळू वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वाळूचा डंपर दहिवडी येथील बाजार पटांगण येथे अडवला व चालक विकास विलास सावंत (रा. दिवड ता. माण) याला ताब्यात घेतले. या घटनेत ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार बी. एस. खांडेकर करत आहेत. तसेच दुसऱ्या घटनेत जाशी येथील एका जुन्या पडक्या घराच्या भिंतीच्या आडोशाला जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून राहुल सदाशिव खरमाटे, अशोक नथुराम खाडे, अजित बाळकृष्ण दराडे, गणेश विनायक खाडे या चौघांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपास हवालदार एस. एस. वावरे करत आहेत.