साखरवाडी(गणेश पवार)
फलटण शहर पोलिसांच्या निर्भया पथकाच्या कारवाया थंडावल्याने विद्यार्थिनींची छेडछाड करणे, त्यांचा विनयभंग करणे, त्यांच्याभोवती दुचाकीवर फिरणे, त्यांना कट मारून जाणे असे प्रकार करीत शहरातील सर्वच महाविद्यालये, शाळांभोवती रोडरोमिओंनी उच्छाद मांडला आहे. शहर पोलिस ठाण्यातील निर्भया पथक फक्त कागदावरच आहे की काय असे वातावरण शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे.
विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी व रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात 'निर्भया' पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.मात्र शहर पोलिसांचे पथक सध्या कोमात गेले आहे. त्यामुळे पालकांच्या जीवाला घोर लागला आहे. कॉलेज व शाळांचा परिसर, बसस्थानक, बस थांबे येथे मुलींची रोडरोमिओंकडून छेडछाड तसेच अश्लील शेरेबाजी, मुलींना पाहून गाड्या जोरात दामटण्याचे प्रकार सर्रास सुरू झाले आहेत.
मात्र, या प्रकाराकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असून रोडरोमिओंवर खास लक्ष ठेवण्यासाठी नेमण्यात आलेले निर्भया पथक' कायम कार्यरत राहणे गरजेचे आहे. त्यांच्याकडून अपेक्षीत कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थिनींसमोर शिक्षण घेण्यासाठी कॉलेजला ये-जा करणे अवघड बनले आहे. पालकांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे.
शहरातील प्रमुख शाळा, कॉलेज याठिकाणी शिक्षणानिमित्त महाविद्यालयात ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींना व महिलांना रोडरोमिओंकडून अश्लील शेरेबाजी व हावभाव करून तसेच त्यांच्या मागेपुढे घुटमळत त्रास देण्याचा प्रकार होत आहे. या गंभीर प्रकाराकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून यासाठी नेमण्यात आलेल्या 'निर्भया' हे पथक केवळ नावालाच आहे का, असा सवाल विद्यार्थिनी करत आहेत. रोडरोमिओंच्या त्रासामुळे पालकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. आपल्या मुलींना शिक्षणासाठी कॉलेजला पाठवायचे की नाही, असा मोठा प्रश्न पालकांसमोर उभा आहे.
कॉलेज अथवा शाळेत गेलेली आपली मुलगी सुरक्षित घरी येईल किंवा नाही याबाबत पालकवर्ग खास करून महिलावर्ग कमालीचा चिंतीत असल्याचेही आढळून आले आहे. आम्ही ज्यावेळी काही कामानिमित्त बाहेर जातो त्यावेळी कॉलेजच्या परिसरात दुचाकींवरून मुलींची छेड काढण्याचे प्रकार दिसून येतात. त्यामुळे आम्हाला आमच्या पाल्यांना कॉलेजला पाठवायचे की नाही, आमच्या पाल्यांचे भविष्याचे काय, मुलींनी शिकावे की नाही, असे प्रश्न पडतात. आजही मुलींना शिकवणे खूप अवघड झाले आहे. कारण शासनाकडून बऱ्याच सुविधा मिळत आहेत. मात्र, कॉलेजच्या परिसरात रोडरोमिओंकडून त्रास होतो. याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष घालावे आणि तात्काळ रोडरोमिओंचा बंदोबस्त करावा अन्यथा आमच्या पाल्यांचे भविष्य शिक्षणाअभावी वंचित राहतील अशी पालकांची मते आहेत.
कॉलेजच्या शाळेच्या रस्त्याला आणि गेटच्या आसपास परिसरातीलच काही मुले घुटमळत असतात. रस्त्यावरून ये-जा करताना आम्हाला छेडतात. आम्हाला पाहून गाड्या जोरात मारणे, शिट्ट्या मारणे तसेच अश्लील भाषेत बोलतात. त्यामुळे आम्हाला कॉलेजला येणे खूपच अवघड झाले आहे, कॉलेज बंद होईल आम्ही घरी सांगत नाही, त्यामुळे टपोरीचा उच्छांद वाढला आहे, असे काही विद्यार्थीनी सांगितले. शहरात पुन्हा एकदा टवाळखोरांचे फावल्याने शिक्षण, नोकऱ्यांसाठी घराबाहेर पडणाऱ्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी तातडीने लक्ष घालून फलटण शहरातील निर्भया पथकांना पुन्हा सुसज्ज करण्याची नितांत गरज आहे.