साखरवाडी(गणेश पवार)
फलटण तालुक्यात कापसाच्या क्षेत्रात होणारी वाढ लक्षात घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटणच्या माध्यमातून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने संबंधितांशी चर्चा करून योग्य कार्यवाही करण्याची माहिती बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
एकेकाळी कापूस उत्पादनात आघाडीवर असलेल्या फलटण, बारामती, अकलूज, पंढरपूर भागातून कीड रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कापूस पीक नामशेष झाले होते. सुमारे ३० / ४० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर गोखळी, खटकेवस्ती भागातील शेतकऱ्यांनी गेल्या ३/४ वर्षांपासून धाडसाने पुन्हा कापूस लागणीला सुरुवात केली. त्यांना यश आल्याचे पाहिल्यानंतर गुणवरे, आसू, पवारवाडी, राजाळे, चौधरवाडी वगैरे भागात कापसाचे क्षेत्र वाढत असून गतवर्षी सुमारे ३५०० एकर क्षेत्रावर कापूस पीक होते. एकरी उत्पादन आणि कापसाला मिळणारा दर समाधानकारक असल्याने या वर्षी कापसाखालील क्षेत्रात मोठी वाढ अपेक्षित आहे.
मात्र शासन यंत्रणा उदासीन असल्याने महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन किंवा कापूस उत्पादक पणन महासंघाच्या माध्यमातून येथे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी वारंवार करूनही शासकीय हमी भाव खरेदी केंद्र सुरू झाली नाहीत.
त्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर आणि सचिव शंकरराव सोनवलकर यांनी याबाबत चर्चा करून आपल्या भागातील निवडक कापूस उत्पादक शेतकरी आणि बाजार समिती संचालक मंडळ यांची संयुक्त बैठक गोखळी परिसरात घेऊन, सर्व समस्या जाणून घेऊन कापूस खरेदीदार यांची संख्या वाढवून विशेषत: आसू व गोखळी परिसरात कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याच्या अनुषंगाने योग्य निर्णय घेऊन कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कापूस विक्रीची समस्या दूर करून त्यांना जास्तीत जास्त क्षेत्रावर कापूस लागणीसाठी प्रोत्साहन देवून या भागातून हद्दपार झालेले हे पांढरे सोने पुन्हा पिकविण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा निर्धार श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.