साखरवाडी(गणेश पवार)
होळ ता फलटण येथील ढगाई माता मंदिराच्या पाठीमागील बंधाऱ्याजवळ आलेल्या सोमेश्वर साखर कारखान्याच्या दूषित मळीयुक्त पाण्यामुळे मागील तीन दिवसांपासून निरा नदी पात्रातील लाखो मासे मृत्युमुखी पडले असून संपूर्ण नदीच्या पाण्याला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नदीचे पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे
परिसरातील काही युवक तीन दिवसांपासून हे मृत मासे पकडून टेम्पोचे टेम्पो भरून भिगवण या ठिकाणी विक्रीस पाठवीत आहेत. रासायनिक पाण्यामुळे मृत्यू झालेल्या मासे खाल्ल्याने जर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालास तर याला जबाबदार कोण? असा सवाल येथील ग्रामस्थ विचारात आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात दूषित पाणी निरा नदीत सोडल्या बाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ संबंधित कारखान्यावर कारवाई करणार का? असा सवाल होळ येथील ग्रामस्थ विचारत असून या दुषित व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये पिकांना पाणी पाजणेसुद्धा असह्य झाले असल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.