साखरवाडी(गणेश पवार)
दिल्ली- मुंबई कॉरिडॉरप्रमाणे केंद्र सरकारने बेंगलोर बॉम्बे इंडस्ट्रियल कॉरिडॉर धर्तीवर कोरेगाव तालुक्यातील सोळशीसह सहा गावांमध्ये तसेच म्हसवड, ता. माण येथेही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक वसाहती विकसीत करा. त्यासाठी सर्व संबंधित लोकप्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी. ते जो निर्णय घेतील तो आम्हास मान्य असेल, अशी लक्षवेधी आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेत मांडली. त्यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लवकरच बैठक घेण्याची ग्वाही दिली व प्रस्तावित एमआयडीसी जिल्ह्याबाहेर जाणार नाही असे सागितले.
औद्योगिक वसाहत म्हसवडलाही करा आणि उत्तर कोरेगावला करा
यावेळी आ. रामराजे म्हणाले की, बेंगलोर- बॉम्बे इंडस्ट्रियल कॉरिडॉर या विषयात कोणताही राजकीय वास न घेता जर निर्णय घेतला तर आमच्या जिल्ह्याचे कल्याण होणार आहे. म्हसवड एमआयडीसीला माझा विरोध नाही. आमचे उत्तर कोरेगाव हे जे लोकेशन आहे, हे जर केंद्र सरकारला पटत असतील तर कॉरिडॉर तिकडे करा. पण तितक्याच ताकतीचा कॉरिडॉर म्हसवडला राज्यातून करून द्या, एकच कॉरिडॉर दोन्हीकडे व्हायला पाहिजे आहे. जो निर्णय केंद्रीय मंत्री सीतारामन यांच्या समोर झाला तो पुढे गेला तर बरं होईल. मी तुम्हाला माझ्याकडे ग्रामपंचायतीचे ठराव असलेले निवेदन पाठवून देतो, तिथे भूसंपादन होतं, तेव्हा काही लोक म्हणतात आम्हाला द्यायचे नाही, काही म्हणतात द्यायची आहे. मला भीती एकच वाटते की, या गोंधळात कॉरिडॉर सांगली किंवा सोलापूरला जाईल. म्हसवड हे शंभर किलोमीटर आत आणि उत्तर कोरेगाव हे सहा किलोमीटर आहे. परंतु मी म्हणणार नाही की म्हसवडला करू नका, म्हसवडलाही करा आणि उत्तर कोरेगावला करा. निर्णय फक्त केंद्र सरकारने घ्यावा. जर अडचण होणार असेल, काही राजकीय तिडा होणार असेल तर मुख्यमंत्र्यांनी फलटण व माणमधील सर्व लोकप्रतिनिधी एकत्र करून मीटिंग घ्यावी. जो निर्णय मुख्यमंत्री घेतील तो आम्हाला मान्य राहील.
प्रस्तावित एमआयडीसी जिल्ह्याबाहेर जाणार नाही
यावर बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, कोरेगाव तालुक्यातील सोळशी आणि परिसरातील गावांमध्ये जो कॉरिडॉर होणार आहे. त्या जागेवर करावा, असे मत आ. रामराजे नाईक निंबाळकर यांचे होते. याबाबत अनेक वेळा माझी आणि त्यांची चर्चा झाली आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्याबरोबर ही बैठक झालेली आहे ते देखील खरं आहे. त्याच्यामध्ये कुठेही वावगे नाही. परंतु ज्या पद्धतीने आ. रामराजे यांच्याकडे काही पत्रव्यवहार झाले आहेत. त्याच पद्धतीचे काही पत्रव्यवहार ग्रामपंचायतीने एमआयडीसी बरोबर केले आहेत. त्यामुळे इथं कोणताही राजकीय हस्तक्षेप किंवा दबाव असण्याचं काही कारण नाही. म्हसवड हा प्रपोजल केंद्र शासनाकडे गेला आहे. पण केंद्र शासनाने अजून तो मंजूर केलेला नाही. मुख्यमंत्री यांच्याबरोबर एक महिन्याच्या आत बैठक घेण्यात येईल. सातारा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विकसित करण्याचा राज्य शासनाचा मानस असला, तरी येथील प्रस्तावित एमआयडीसी जिल्ह्याबाहेर जाणार नाही, अशी ग्वाहीही उदय सामंत यांनी दिली.
आपल्यातला खरा विश्वासघातकी कोण ?
उत्तर कोरेगावमध्ये कॉरिडॉर व्हावा म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न केला. परंतु कॉरिडॉर अखेर माण तालुक्यामध्ये गेला असल्याचे समजते. मात्र आपण हार मानायची नाही, सत्तेपुढे शहाणपण नाही पण आपल्यातला खरा विश्वासघातकी कोण आहे हे ओळखण्याची गरज असल्याचे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या व्हॉटसअप स्टेटसवर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, कॉरिडॉरसंबंधी खासदारांची भूमिका काय? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या धर्तीवर बँगलोर-मुंबई आर्थिक कॉरिडॉर करीता उत्तर कोरेगाव हे लोकेशन केंद्र सरकारला योग्य वाटत असेल तर कॉरिडॉर तिकडे करा. पण तितक्याच ताकदीचा कॉरिडॉर राज्यातून म्हसवडला करून द्या, अशी मागणी महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी लक्षवेधीमार्फत शुक्रवारी विधान परिषदेत केली होती. त्यानंतर आ. रामराजे यांनी आपल्या मोबाईलच्या व्हॉटसअॅप स्टेटसला पोस्ट टाकत आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगीकरण करणार असून यासाठी लवकरच मिटिंग बोलवणार आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, आवाहनही त्यांनी केले आहे. माण तालुक्यातील कॉरिडॉरला आमचा बिलकुल विरोध नव्हता. मात्र दोन्ही ठिकाणी कॉरिडॉर झाले असते तर सातारा जिल्ह्यांमध्ये मोठी औद्योगिक क्रांती झाली असती व जिल्ह्याच्या प्रगतीला मोठा हातभार लागला असता असेही आ. रामराजे यांचे म्हणणे आहे.