साखरवाडी गणेश पवार
साखरवाडी शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विभागात दि 25 व 26 फेब्रुवारी रोजी प्रशालेचे माजी विद्यार्थी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध चित्रकार चंद्रकांत तात्याबा फडतरे यांच्या जगप्रसिद्ध चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले असल्याची माहिती माजी विद्यार्थी संघाचे कार्यवाहक हरिदास सावंत सर यांनी दिली.
चंद्रकांत फडतरे हे सन 1975 च्या बॅचचे माजी विद्यार्थी असून ते प्रशालेचे कलाशिक्षक कै रमेश बिडवे सर यांचे शिष्य असून दिवंगत बिडवे सरांच्या स्मरणार्थ त्यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले असून त्यांच्या चित्रांची आजपर्यंत मुंबईतील प्रसिद्ध जहांगीर आर्ट, बजाज आर्ट, ताओ आर्ट, ताज हॉटेल, ठाण्यातील गडकरी रंगायतन, सांगलीतील कलानिकेतन, दिल्ली आर्ट, त्याचबरोबर प्रदेशात ब्रिटन, रोम, पॅरिस, दुबई व अशा शंभरहून अधिक ठिकाणी प्रदर्शने भरवण्यात आली आहेत.
साखरवाडीत होणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन साखरवाडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्या हस्ते शनिवार दि 25 रोजी सकाळी 10 वाजता होणार असून यावेळी संस्थेचे अध्यक्ष धनंजय साळुंखे पाटील, प्रशालेचे माजी विद्यार्थी सातारा विभागाचे विभागीय समाजकल्याण उपायुक्त नितीन उबाळे, सहकारी संस्था सहाय्यक निबंधक सुनील धायगुडे, संस्थेचे संचालक राजेंद्र भोसले मुख्याध्यापिका उर्मिला जगदाळे, पर्यवेक्षक तुळशीदास बागडे व संपूर्ण बिडवे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. साखरवाडी सारख्या ग्रामीण भागात पहिल्यांदाच अशा अलौकिक प्रतिभेच्या चित्रांचे प्रदर्शन होत असून याचा लाभ सर्व नागरिक, माजी विद्यार्थी,पालक यांनी घ्यावा प्रवेश सर्वांसाठी मोफत असल्याचे हरिदास सावंत सर यांनी सांगितले आहे.